मुंबई देशातील सर्वात मोठ्या कंपनींपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची आज 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliance AGM) पार पडली. या AGM मध्ये रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आगामी वर्षभरातील कंपनीच्या योजनांची माहिती दिली. आज झालेल्या AGM मध्ये मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 


रिलायन्सच्या सर्वसाधारण बैठकीतील महत्त्वाच्या घोषणा : 


कंपनीने गेल्या 10 वर्षात 150 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. इतर कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीच्या तुतनेत ही मोठी रक्कम आहे. रिलायन्सने या काळात लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे. ही नवीन रिलायन्स आहे, नवीन युगाची आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे. नवीन रिलायन्स नवीन भारताचा मार्ग दाखवत आहे आणि टेक मॅन्युफॅक्चरिंगसह तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करत असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले. 


भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. या देशात सगळे समृद्ध असतील असा देश निर्माण करायचा आहे. लवकरच भारताचे दरडोई उत्पन्न हे 10 हजार डॉलरपर्यंत पोहचेल असे मुकेश अंबानी यांनी म्हटले. 


रिलायन्स इंडस्ट्रीजने सरकारी तिजोरीत 1,77,173 कोटी रुपयांची भर घातली आहे. मागील एका वर्षात 1271 कोटी रुपयांचे सीएसआर अंतर्गत कामे केली आहेत. तर, 2.6 लाख लोकांना रोजगार दिले आहेत. रिलायन्स हे महसूल, नफा, निर्यात, बाजार भांडवल, रोजगार निर्मिती, सीएसआर अंतर्गत कामे आदी क्षेत्रात अग्रसेर आहे. 


रिलायन्स जिओ : 


रिलायन्स जिओचा महसूल 1,19,791 कोटी रुपये आहे. मागील वर्षभरात यात  20 टक्क्यांची वाढ झाली आहे. जिओच्या ग्राहकांची संख्या 450 दशलक्षाहून अधिक झाली असल्याचे रिलायन्सच्या AGM मध्ये सांगण्यात आले. डेटाचा वापर हा सरासरी 25 जीबी प्रति युजर्स प्रति महिना इतका असून एकूण वापर हा 1100 कोटी जीबीहून अधिक आहे. रिलायन्स जिओ हे सात वर्षापूर्वी लाँच करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकाला जिओशी कनेक्ट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. आता प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी एआय (आर्टिफिशिल इंटेलिजन्स) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 


गणेश चतुर्थीच्या दिवशी, 19 सप्टेंबर रोजी Jio Air Fiber लॉन्च होणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या AGM मध्ये बोलताना केली. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात जिओने 5 जी लाँच केले होते. आता, 50 दशलक्षाहून अधिक 5 जीचे ग्राहक आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत 5 जी  सेवा संपूर्ण देशभरात सुरू करण्याचे रिलायन्स जिओचे उद्दिष्ट आहे. 


आताही 25 कोटी भारतीय 2जी इंटरनेट सेवा वापरत आहेत. त्यांच्यासाठी जिओने 4जी इनबेल्ट जिओ भारत मोबाईल फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत 999 रुपये आहे. या मोबाईल फोनवरून युपीआय पेमेंट करता येऊ शकते. यामुळे जिओला आणखी नवीन ग्राहक मिळतील असा विश्वास एजीएम मध्ये व्यक्त करण्यात आला. मोबाईल ग्राहक अधिकाधिक जिओची निवड करत आहेत. मोबाईल नंबर पोर्ट करण्यात जिओचा दर हा नजीकच्या प्रतिस्पर्धी टेलिकॉम कंपनीच्या तुलनेत पाच पट अधिक आहे. 


रिलायन्स रिटेल 


रिलायन्स रिटेलचा वार्षिक महसूल 2022-23 या आर्थिक वर्षात 2,60,364 कोटी रुपये होता, जो वार्षिक 30 टक्क्यांनी वाढला आहे. रिलायन्स रिटेलचा EBITDA रु. 17,928 कोटी आणि निव्वळ नफा रु. 9,181 कोटी आहे. गेल्या आर्थिक वर्षात स्टोअरमध्ये 78 कोटीहून अधिक नागरिकांची नोंद झाली आहे.


रिलायन्स फायनान्शिअल 


जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आता आयुर्विमा, आरोग्य आणि इतर विमा क्षेत्रात उतरणार असल्याचे रिलायन्से अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, डिजीटल-फर्स्ट अॅप्रोचसह जिओच्या वित्तीय सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने 'ब्लॅकरॉक'सोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा याआधीच केली आहे. या भागीदारीतून मालमत्ता व्यवस्थापन  (Asset Mangment Company) कंपनी सुरू केली जाईल. BlackRock ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) आहे. 


रिलायन्स ऑईल टू केमिकल 


केजी बेसिनमध्ये एमजे फील्डचे 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत यशस्वीपणे काम सुरू करण्यात आले आहे.  यातून 30 दशलक्ष स्टँडर्ड क्युबिक गॅस तयार होईल. हा देशातील एकूण उत्पादनाच्या 30 टक्के इतका आहे. यामुळे दरवर्षी 7 अब्ज डॉलरची आयात बचत होईल. 


तेल ते केमिकलचा व्यवसाय 2035 पर्यंत कार्बन शून्य करणे आवश्यक आहे. या अंतर्गत जामनगर रिफायनरी रासायनिक आणि मटेरियल फीडस्टॉक प्रोडक्शन इंजिन म्हणून काम करणार आहे. 


तिन्ही मुले संचालक मंडळावर, नीता अंबानींचा बाहेर पडण्याचा निर्णय


नीता अंबानी या रिलायन्सच्या संचालक मंडळामधून बाहेर पडल्या आहेत. तर, मुकेश आणि नीता अंबानी यांची तिन्ही मुले अंनत, आकाश आणि मुलगी ईशा अंबानी आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर असणार आहेत. हा निर्णय म्हणजे रिलायन्समध्ये तिसऱ्या पिढीची सुरुवात असल्याची म्हटले जात आहे.