US Economy : कोरोनाच्या धक्क्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे अमेरिकेमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. अमेरिकेत मंदीचे सावट दिसत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था 1.6 टक्क्यांनी घटली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ही घट दिसून आली आहे. अमेरिकेच्या Bureau of Economic Analysis ने बुधवारी ही माहिती दिली. अमेरिकेत मंदीचे सावट दिसत असल्याने जगात चिंता व्यक्त केली जात आहे. 


जानेवारी-मार्च महिन्याच्या तिमाहीसाठी सरकारने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा वाईट स्थिती आहे. यामुळे देशात मंदीची शक्यता वाढली आहे.  अमेरिकेच्या जीडीपीत 2020 च्या दुसऱ्या तिमाहीनंतर ही मोठी घसरण आहे. वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था 6.9 टक्क्यांनी वाढली होती. अमेरिकेतील महागाईने चार दशकातील उच्चांक गाठला आहे. 


Bureau of Economic Analysis च्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या दरम्यानच्या काळात Real gross domestic productमध्ये 1.6 टक्क्यांची घसरण झाली आहे.  एप्रिल महिन्यात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार, जीडीपी दरवाढीत 1.4 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर, मे महिन्यात हाच अंदाज 1.5 टक्के इतका वर्तवण्यात आला होता. Bureau of Economic Analysis ने म्हटले की, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या तेजीमुळे पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. 


अर्थव्यवस्थेत घसरण 
 
या वर्षाच्या सुरुवातीस रशिया-युक्रेन युद्ध पेटले.  त्याचा परिणाम जगावर झाला. जगातील पुरवठा साखळीवरही परिणाम झाला. त्याशिवाय, खाद्यान्न, वित्तीय सेवा आणि ऊर्जा बाजारपेठेवरही याचा परिणाम दिसून आला. कच्च्या मालाच्या पुरवठ्यापासून,  पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणी, नोकर कपात, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ आदी विविध कारणांमुळे अमेरिकेत महागाईने चार दशकातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे देशात मंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलग दोन तिमाहीत जीडीपीत घसरण दिसून आल्यास त्याला मंदी असलयाचे म्हटले जाते. अमेरिकेतील दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीचा अंदाज 28 जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे.