RBI on Rs 2000 notes: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचं जाहीर केलं होतं, त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार नोटा जमा करण्यात येत आहेत. बँकांमध्ये 23 मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत 2000 रुपयांच्या (Rs 2000 notes) किती नोटा जमा झाल्यात, याची माहिती आरबीआयने दिली आहे. 


दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेत परत


आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली की, 2000 रुपयांच्या जेवढ्या नोटा चलनात होत्या, त्यापैकी आता 76 टक्के नोटा बँकांकडे आल्या आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत 3.62 लाख कोटी मूल्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयने दिली. 19 मे 2023 पर्यंत 3.56 लाख कोटींच्या नोटा परत केल्या गेल्या. तेव्हापासून 30 जून 2023 पर्यंत 2.72 लाख कोटी मूल्यांच्या दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. अशी माहिती आरबीआयने दिली. आतापर्यंत दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेत जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयने दिली.


दोन हजारांच्या नोटा परत करण्यासाठी 30 सप्टेंबरची डेडलाईन


2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी अजून 3 महिन्यांचा कालावधी आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या 76 टक्के नोटा बँक खात्यात जमा करण्यात आल्या आहेत, हे आमच्या अपेक्षेनुसार आहे. बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी कोणतीही घाई, गोंधळ सुरू नसल्याची माहिती आरबीआयने दिली. लोकांनी वेळ काढून 2000 रुपयांच्या नोटा आरामात जमा कराव्या किंवा बदलून घ्याव्या, असंही आरबीआयने म्हटलं आहे.




शेवटच्या क्षणी करू नका घाई


आपल्यापैकी अनेकांना अखेरच्या क्षणी काम करण्याची सवय असते. मात्र, या 2000 रुपयाच्या नोटा जमा करण्यासाठी कोणीही शेवटच्या दिवसाची प्रतिक्षा करू नये, असं आवाहन आरबीआयने केलं आहे. सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या 10 ते 15 दिवसांत बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी गर्दी होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.


2016 च्या नोटबंदीनंतर चलनात आली 2000 ची नोट 


8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली, त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर, त्याच वर्षी RBI कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.


मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही


2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. 


हेही वाचा:


GK: गाडीच्या नंबर प्लेटवरुन तुम्ही शोधू शकता गाडीच्या मालकाचं नाव; कसं? पाहा...