मुंबई : सध्या देशात लोकसभ निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहतेय. सगळं वातावरण राजकारणानं भारलेलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने देशातील वेगवेगळ्या नेत्यांची संपत्ती किती आहे, ते नेमकेपणानं समोर येत आहे. काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi Portfolio) यांनी घेतलेले शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये (Mutual Fund) केलेली गुंतवणूक याच निमित्ताने समोर आली. त्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor Wealth) यांचीदेखील संपत्ती आता समोर आली आहे. ते कोट्यवधी रुपयांचे मालक असून त्यांनी विदेशातही गुंतवणूक केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी क्रिप्टेकरन्समध्येही पैसे गुंतवलेले आहेत. 


बिटकॉईनमध्ये लाखो रुपये गुंतवले


शशी तरुर हे उच्चविद्याभूषित आहेत. अस्खलितपणे इंग्रजी बोलणारे नेते म्हणून ते देशभरात ओळखले जातात. त्यांनी राजकारणात त्यांचं वेगळेपण जपून ठेवलेलं आहे. त्यांच हेच वेगळेपण पैशांच्या गुंतवणुकीच्या बाबतीतही दिसून येतं. अनेक नेते शेअर्स खरेदी करतात, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतात, काही नेते जमीन खरेदी करतात. पण शशी थरूर यांनी मात्र बिटकॉईन या क्रिप्टोकरन्समध्ये गुंतवणूक केलेली आहे. बिटकॉईन हे एक आभासी चलन आहे. त्यांच्याजवळ 5 लाख 11 हजार 314  रुपयांचे बिटकॉईन्स आहेत. 


वेगवेगळ्या क्षेत्रात थरुर यांची गुंतवणूक


क्रिप्टोकरन्सीसोबतच शशी थरुर यांनी विदेशातील शेअर्सदेखील खरेदी केलेले आहेत. यासह कॉर्पोरेटेड बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्योरिटीमध्येही (G-Sec) त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. शशी थरूर यांनी विदेशी शेअर बाजारात 9.33 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्याकडे 3.46 कोटी रुपयांचे कार्पोरेट बॉण्ड्स आहेत. यासह त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांचे यूएस ट्रेजरी सिक्योरिटीज आहे. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या माध्यमातून त्यांनी 91.7 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. एसटी कॅपिटल एलएलसी या कंपनीकडून थरूर यांनी 1.1 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे.  


थरुर यांची एकूण संपत्ती 56 कोटींपेक्षा अधिक


दरम्यान शशी थरुर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 36 हजार रुपये रोख स्वरुपात आहेत. ते अनेक म्युच्युअल फंड आणि गुंतवणूक योजनांत पैसे गुंतवतात. थरुर यांच्याकडे 49.3 कोटी रुपयांची जंगम तर 6.75 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. म्हणजेच त्यांची एकूण संपत्ती ही 56 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.