मुंबई : आरबीआय आता यूपीआय अर्थात यूनिफाईड पेमेन्ट्स इंटरफेस (Unified Payments Interface -UPI) संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. येत्या काळात क्रेडिट कार्ड यूपीआयला जोडण्यात येणार असून त्यामुळे देशातल्या असंख्य ग्राहकांना, क्रेडिट कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे. त्याची सुरुवात रुपे कार्डपासून (RuPay card) करण्यात येणार असल्याची  माहिती आहे. 

Continues below advertisement

कॅशलेस इंडियाकडे वळतांना सर्वात मोठा वाटा होता तो फिनटेक कंपन्यांचा. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली. त्यातल्या त्यात यूपीआय मार्फत मोठ्या प्रमाणात व्यवहार वाढू लागलेत. यात आणखी भर पडावी यासाठी आरबीआयकडून आणखी एक सुविधा अंमलात आणण्याचा विचार आहे. आता युपीआयच्या माध्यमातून कोट्यवधी ग्राहक केवळ बचतखाते किंवा चालू खात्यातूनच नव्हे तर क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट करू शकतील. त्यामुळे युपीआयद्वारे पेमेंट करणं सोपं होईल.  नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारा जारी केलेल्या रुपे क्रेडिट कार्डद्वारे याची सुरुवात होईल. सिस्टिम विकसित होत असताना इतर कार्ड जसे मेस्ट्रो, व्हिजा क्रेडिट कार्डसारख्या कार्डसाठी देखील ही सुविधा उपलब्ध होईल. या निर्णयाचा शेअरबाजारावरही परिणाम बघायला मिळाला. एसबीआय कार्ड, पेटीएम, ॲक्सिस बॅंकसारख्या बॅंकांचे देखील शेअर्स वधारलेत. याचं मुख्य कारण, बॅंकांसोबतच फिनटेक कंपन्यांना ही सुविधा गेमचेंजर मानली जात आहे. 

कसा होणार फायदा?

Continues below advertisement

  • देशात तब्बल 10 लाख कोटींहून अधिकचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होतात.
  • यूपीआयला 26 कोटी वापरकर्ते तर 5 कोटी व्यापारी जोडले गेलेत.  
  • मे महिन्यात युपीआयद्वारे 594.63 व्यवहार झाले आहेत. ज्यात 10.40 लाख कोटींचे व्यवहार एकट्या यूपीआयद्वारे झाल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे.
  • यूपीआयद्वारे व्यवहार आणखी वाढवण्यावर आरबीआयचा भर आहे. 
  • ग्राहकांना या निर्णयाचा फायदा तर होईलच, सोबतच बॅंकिंग सिस्टिम, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट गेटवेंना देखील मदत होईल.
  • मागील अनेक दिवस गटांगळ्या खात असलेल्या पेटीएमचे शेअर्स देखील वधारल्याचे चित्र आहे 

यूपीआयची व्याप्ती वाढवण्यासोबतच रुपी कार्डद्वारे व्यवहार वाढवण्यावरही सरकारचा भर आहे. मात्र, आतापर्यंत तुम्ही तुमच्या खिशात जितके पैसे असायचे तितकेच पैसे खर्च करायचा. आता मात्र तुम्ही यूपीआयद्वारे तुमच्या खिशात नसलेले पैसेही वापरू शकणार आहात. त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलचे नियोजन नीट करत असाल तर हा निर्णय तुमच्या फायद्याचा आहे, नाहीतर तुमच्यावरील कर्ज वाढण्याचा धोका देखील आहे.