Explainer RBI Rate Hike: रिझर्व्ह बँकेने आज पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात आली असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. कर्जाचे व्याज दर वाढल्याने महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कसा होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेऊयात या मागील अर्थचक्र...


महागाई उच्चांकी पातळीवर
 
रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धामुळे भारतासह संपू्र्ण जगात महागाई वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरबीआयकडून व्याज दरात वाढ करण्यात येईल, असे म्हटले जात होते. त्यामुळे रेपो दरात किती वाढ होणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. 


रेपो दर वाढल्याने महागाई नियंत्रणात 


अर्थतज्ज्ञांनी सांगितले की,  रेपो रेट वाढवल्याने आणि सीआरआर दरात वाढ केल्याने बाजारातील लिक्विडिटी कमी होते. कोरोना महासाथीच्या काळात बाजारात मागणी कमी झाली होती. त्यावेळी जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी व्याज दरात कपात करून कृत्रिम मागणी निर्माण केली होती. आरबीआयनेदेखील असेच पाऊल उचलले होते. आता मात्र, परिस्थितीती बदलली आहे. बाजारात अतिरिक्त लिक्विडिटी असल्याने महागाईचा दर अधिक झाला आहे.


आता रेपो दरात वाढ केल्याने कर्जे महागणार आहेत. यामुळे बाजारातील लिक्विडिटी कमी होणार आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यास मदत होईल. बाजारातून लिक्विडिटी कमी केल्याने कृत्रिम मागणीवर नियंत्रण मिळवणे सोपं जाते. कर्जे महागल्याने मागणी कमी होते आणि महागाई वाढीच्या वेगावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले जाते. 


दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, अधिक पैसे बाजारात असल्याने वस्तू खरेदीला मागणी येते. त्याशिवाय अनावश्यक खर्चातून खरेदीदेखील होते. अधिक मागणी व उत्पादन कमी असल्याने महागाई वाढते. रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांमुळे बाजारातून लिक्विडिटी अथवा अतिरिक्त पैशांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अनावश्यक खरेदीचे प्रमाण कमी होईल आणि महागाईवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या होमलोनचा ईएमआय किती वाढणार?