RBI Repo Rate : एप्रिल महिन्यात किरकोळी महागाईने मागील आठ वर्षाचा उच्चांक गाठला. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर हा 7.79 टक्के इतका नोंदवण्यात आला. महागाईच्या या आकड्याने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या चिंतेत वाढ केली आहे. जून महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या रेपो दर 4.40 टक्के असून हा दर 4.75 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास कर्ज आणि कर्जाचे हप्ते आणखी महाग होणार आहे. 


रिझर्व्ह बँकेची तीन दिवसीय बैठक 


रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक 6 ते 8 जून 2022 रोजी दरम्यान पार पडणार आहे. आरबीआयकडून 8 मे रोजी पतधोरण जाहीर केले जाणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने बैठकीनंतर अचानकपणे रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के आणि सीआरआर 50 बेसिस पॉईंटने वाढून 4 टक्क्यांहूनु 4.50 टक्के इतका केला. सीसीआरमधील नवीन दर 21 मे पासून लागू करण्यात येणार आहे.


रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.