RBI Monetary Penalty : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) निर्देशांचे पालन न केल्याबद्दल तीन बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावला (Monetary Penalty) आहे. आरबीआय (RBI) ने नियमांचं उल्लंघन (Violation of Rules) केल्याप्रकरणी बँकांना 10 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सिटी बँक (Citibank) वर सर्वाधिक पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ला 4.34 कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला (Overseas Bank) एक कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, पाच को-ऑपरेटिव्ह बँकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
कारवाईचं नेमकं कारण काय?
खासगी क्षेत्रातील सिटी बँकेला सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकेवर बँकिंग नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तसेच, जोखीम व्यवस्थापन आणि वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगसाठी RBI मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाही. तर, बँक ऑफ बडोदावर सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ लार्ज कॉमन एक्सपोजरच्या स्थापनेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यासोबतच, चेन्नईस्थित सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक कर्ज आणि आगाऊ नियमांचे पालन न केल्याबद्दल दोषी आढळली आहे. त्यामुळे या बँकेलाही दंड ठोठावण्यात आल आहे.
ग्राहकांना फटका बसणार नाही
मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन न केल्यामुळे या तिन्ही बँकांवर हा दंड ठोठावण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यन, ग्राहकांना बँकांवरील कारवाईचा फटका बसणार नाही. बँका आणि त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हा या कारवाईचा उद्देश नाही. आरबीआयने या बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये त्याला दंड टाळण्यासाठी स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे.
पाच सहकारी बँकांनाही ठोठावला दंड
यापूर्वी आरबीआयने विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच सहकारी बँकांवर दंड ठोठावला होता. यामध्ये श्री महिला सेवा सहकारी बँक, पोरबंदर विभागीय नागरिक सहकारी बँक, सर्वोदय नागरिक सहकारी बँक, खंभात नागरिक सहकारी बँक आणि वेजलपूर नागरिक सहकारी बँक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 25 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अभ्युदय बँकेवर मोठी कारवाई
आरबीआय शुक्रवारी अभ्युदय बँकेला मोठा दणका दिला आहे. अभ्युदय बँकेचं संचालक मडळ आरबीआयने 1 वर्षासाठी बरखास्त केलं आहे. मात्र, बँकेच्या कारभारावर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाहीत. सेंट्रल बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची अभ्युदय सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय सल्लागारांची समितीही नेमण्यात आली आहे. अभ्युदय सहकारी बँकेच्या कारभाराच्या दर्जाहीन दर्जामुळे ही कारवाई करणं भाग पडल्याचं रिझव्र्ह बँकेने सांगितलं आहे.