मुंबई : स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये 25 नोव्हेंबर ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी, घटना समितीच्या शेवटच्या बैठकीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं समारोपाचं भाषण केलं होतं. आपल्या शेवटच्या भाषणात त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. जाणून घेऊया राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतिहासातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. 


1664- शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला 


डोंगरी किल्यांच्या बरोबरीने अरबी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जलदुर्गांचे महत्त्व आहे हे सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी ओळखलं. त्यानंतर शिवरायांनी सागरी किल्ल्यांची निर्मिती सुरू केली. स्वराज्यातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला असलेला सिंधुदुर्ग (Sindhudurg) हा त्यापैकीच एक. या किल्ल्याच्या निर्मितीसाठी शिवरायांनी मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट निवडले. आजच्याच दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर 1664 रोजी शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. शिवरायांच्या हस्ते ही पायाभरणी करण्यात आली. या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 500 खंडी शिशाचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. 


असं म्हटलं जातं की हा किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. या किल्ल्याच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला किल्ला अशी ओळख असलेला सिंधुदुर्ग जवळपास साडेतीनशे वर्षे समुद्राच्या लाटा झेलत उभा आहे. या किल्ल्याचे क्षेत्र सुमारे 48 एकर आहे आणि त्यांचा तट दोन मैल इतका आहे. या तटाची उंची 30 फूट तर रूंदी 12 फूट आहे. या किल्ल्याच्या तटास ठिकठिकाणी भक्कम असे 22 बुरुज आहेत. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत.या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. 1695 साली शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे.


1867- आल्फ्रेड नोबेलला डायनामाईटसाठी पेटंट 


जगातील सर्वात घातक विस्फोटक अशी ओळख असलेल्या डायनामाईटचे (dynamite) पेटंट आजच्याच दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर 1867 रोजी आल्फ्रेड नोबेल याला मिळालं. आल्फ्रेड नोबेलने (Alfred Nobel) डायनामाईटचा शोध लावला होता. त्याला पेटंट मिळाल्यानंतर डायनामाईटबद्दल जगाला माहिती झाली. नोबेलने 14 जुलै 1867 रोजी पहिल्यांदा डायनामाईटचा विस्फोट केला होता. डायनामाईट बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान आल्फ्रेड नोबेलच्या एका भावाचा मृत्यू झाला होता. नंतरच्या काळात डायनामाईट या विस्फोटकामध्ये जगाला नष्ट करण्याची क्षमता असून त्याचा गैरवापर झाल्यास ही गोष्ट सत्यात येऊ शकते याची जाणीव नोबेलला झाली. म्हणून त्याने आपल्या संपत्तीचा उपयोग मानवतावादी कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यासाठी वापरण्याचं ठरवलं. डायनामाईटपासून मिळालेल्या संपत्तीतून त्याच्या नावाने नोबेल पुरस्कार देण्यात येतात. 


1872: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म


कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. त्यांचा जन्म नोव्हेंबर रोजी झाला. पारतंत्र्याच्या काळात पत्रकार म्हणून ते आपले विचार 'केसरी'च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते. पण त्याच काळात खाडिलकरांनी 'स्वयंवर' 'मानापमान' सारखी ललित नाटके लिहिली. ते ‘नाट्यचार्य खाडिलकर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. एक प्रकारे त्यांच्या मनाची घडण आध्यात्मिक होती. त्यांच्या नाटकांतील अनेक पात्रे या गुणांचे दर्शन घडवितात. खाडिलकरांच्या सगळ्या नाटकांत न.चिं, केळकर|तात्यासाहेब केळकरांनी म्हटल्याप्रमाणे 'ओज हा गुण आहे'; त्यांचे शृंगाररस आणि करुणरससुद्धा ओजगुणान्वित असतात; व त्यामुळे त्या रसाभोवती एक प्रकारचे उदात्त वातावरण निर्माण होते. मराठ्यांच्या इतिहासातही हेच कारुण्य-नाट्य आहे. खाडिलकरांनी 'स्वयंवर', 'भाऊबंदकी' किंवा 'सवाई माधवराव यांचा मृत्यु' हे नाटकांचे विषय त्याचसाठी निवडले. 1925 मध्ये त्यांनी नवाकाळची स्थापना केली. नवाकाळ हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे दैनिक वृत्तपत्र आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दैनिक वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक होते. मुंबईतील गिरगावातून हे वृत्तपत्र प्रकाशित होते.


1921 : भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म


भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर हे मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. आजच्याच दिवशी हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली. भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत.. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते.


1948- एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेड कोअरची स्थापना 


राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे नॅशनल कॅडेड कोअर (National Cadet Corps-NCC) ही भारतातील देशांतर्गत नागरी संरक्षण आणि नागरी सेवकासाठी कार्य करणारी विद्यार्थी सेवा संघटना आहे. 26 नोव्हेंबर 1948 रोजी विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा आणि महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे.


1949- घटना समितीची शेवटची सभा 


भारतीय घटना निर्मिती करणाऱ्या घटना समितीचा 25 नोव्हेंबर 1949 रोजी शेवटची बैठक होती. भारताची संविधान सभेची स्थापना 1946 साली करण्यात आली होती. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या समितीने केलं. 1947 साली भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले. भारतीय राज्यघटनेला 26 नोव्हेंबर 1949 रोजी मान्यता देण्यात आली. त्याच्या आधी एक दिवस म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी संविधान सभेची शेवटची बैठक झाली. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समारोपाचं भाषण केलं. 


1952- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा जन्मदिन 


पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1952 रोजी लाहोर या शहरात झाला. इम्रान खान हे 1971 ते 1992 या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघात होते. 1992 साली विश्वविजेत्या पाकिस्तान संघाचे ते कर्णधार होते. 1995 नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1996 साली त्यांनी  पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या पक्षाची स्थापना केली. 2018 ते 2022 या दरम्यान ते पाकिस्तानचे पंतप्रधान होते. नंतर त्यांचे सरकार पडले आणि त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. इम्रान खान यांच्यावर नुकतंच एका रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारातून ते बचावले. 


1983- झुलन गोस्वामीचा जन्मदिन 


भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या खेळाने एक वेगळाच ठसा उमटवणाऱ्या झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिचा आज जन्मदिन आहे. 25 नोव्हेंबर 1983 रोजी तिचा जन्म झाला. भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये ती अष्टपैलू खेळाडू होती. 2011 साली आयसीसी महिला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात झुलन गोस्वामी सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू आहे. 


तिला 2007 साली आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कार मिळाला. 2008 ते 2011 साली ती भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार होती. 2010 साली तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर 2012 साली तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 


1984- यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन 


महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा आज स्मृतीदिन. 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. यशवंतराव चव्हाण यांनी युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ आणि ऋणानुबंध या साहित्याची रचना केली. 


सन 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (1977-78) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.


2016- क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन 


क्युबन कम्युनिस्ट क्रांतीचे जनक असलेल्या फिडेल कॅस्ट्रो (Fidel Castro) याचे 25 नोव्हेंबर 2016 रोजी निधन झालं. त्यावेळी तो 90 वर्षांचा होता. साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या आधारे फिडेल कॅस्ट्रो याने क्युबात क्रांती केली. त्याने स्थापन केलेल्या  ‘26 जुलै मूव्हमेंट’ या संघटनेला तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि क्युबात त्याच्या नेतृत्वाखाली नव्या साम्यवादी विचारसरणीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यानं तब्बल 47 वर्षे त्याने क्युबावर निर्विवादीत वर्चस्व गाजवले. त्याच्या काळात साम्यवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने अनेक पाऊले उचलली. 


अमेरिकेने जवळपास 45 वर्षांहून जास्त काळ क्युबावर आर्थिक निर्बंध लादले. तरीही फिडेल कॅस्ट्रो डगमगला नाही. अमेरिकेची गुप्तहेर संघटना असलेल्या सीआयएने फिडेल कॅस्ट्रोला अनेकदा ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. पण कॅस्ट्रो या सर्वांना पुरून उरला. 



इतर महत्त्वाच्या घटना


1882 : मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म
1741 : रशियामध्ये सत्तापालट
1866 : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे उद्धाटन 
1960 : देशात पहिली STD सेवा सुरू
1975 : सुरिनाम या देशाला स्वातंत्र्य 
1991: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.