RBI Penalty on Banks: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नं विविध बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल नऊ सहकारी बँकांना सुमारे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयनं (Reserve Bank of India) सोमवारी निवेदनाद्वारे ही माहिती दिली. निवेदनात आरबीआयनं सांगितलं की, देशभरातील नऊ बँकांवर 11.60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकांच्या यादीत सर्व सहकारी बँकांचा समावेश आहे. 


रिझर्व्ह बँक गेल्या काही काळापासून नियमांचं योग्य पालन न करणाऱ्या बँकांविरोधात कठोर भूमिका घेत आहे. आता 9 बँकांविरोधात आरबीआयनं कारवाई केली आहे. सोमवारी RBI नं बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 9 सहकारी बँकांवर लाखो रुपये शुल्क आकारले आहे.


कोणत्या बँकांना किती दंड? 


बेरहामपूर सहकारी अर्बन बँक (ओडिशा) (Berhampur Urban Cooperative Bank Ltd) यांना 3.10 लाख रुपये, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेला (Osmanabad Janata Sahakari Bank) 2.5 लाख रुपये (महाराष्ट्र) आणि संतरामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला (गुजरात) 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, मध्य प्रदेश, जमशेदपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. झारखंड आणि रेणुका नागरी सहकारी बँक, छत्तीसगड यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


आरबीआयनं 'या' बँकांनाही ठोठावला दंड


तसेच, कृष्णा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मध्य प्रदेश आणि केंद्रपाडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ओडिशा यांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयच्या निवेदनानुसार, नवानगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गुजरातला 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


आरबीआयनं काय म्हटलंय? 


आरबीआयनं म्हटलंय की, ही कारवाई बँकिंग नियमांच्या कामकाजांसदर्भातील अटींचं पालन केल्यामुळं करण्यात आली आहे. याचा उद्देश त्या बँकेनं आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतू नाही. 


RBI कडून नियामक कारवाई 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी बँकांच्या कामगिरीचं मूल्यांकन करत असते आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाई करते. अलीकडे RBI नं आणखी काही बँकांवर नियामक कारवाई देखील केली आहे. त्यापैकी काही बँकांना मोठा भुर्दंडही पडला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


युनिकॉर्न स्टार्टअप डार्विन बॉक्सचा आयपीओ प्लॅन, जाणून घ्या काय आहे तपशील