RBI Action On IIFL Finance : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आयआयएफएल फायनान्सला (IIFL Finance) दणका देत त्याविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला गोल्ड लोन (Gold Loan) वितरणावर बंदी घातली आहे. असं असलं तरीही कंपनी तिच्या सध्याच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओची सेवा सुरू ठेवेल. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचा जुन्या ग्राहकांवर काही परिणाम होणार नाही. 


स्पेशल ऑडिटनंतर जर समाधानकारक निकाल आल्यास IIFL फायनान्सला दिलासा दिला जाऊ शकतो असे आरबीआयने म्हटले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेनंतर एका महिन्यात आरबीआयची ही दुसरी मोठी कारवाई आहे.


 






या नियमांचे उल्लंघन होत होतं


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 अंतर्गत आरबीआयने ही कारवाई केली आहे. आयआयएफएल फायनान्सला तत्काळ प्रभावाने कोणतेही गोल्ड लोन मंजूर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीदरम्यान, गोल्ड लोन वितरणामध्ये अनियमितता आढळून आली आहे. 


गोल्ड लोन वितरण आणि लिलावादरम्यान कंपनी सोन्याची शुद्धता आणि वजन याबाबत योग्य अहवाल देत नव्हती. याशिवाय कर्ज ते मूल्य गुणोत्तराचेही उल्लंघन होत होते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आयआयएफएल फायनान्स कर्ज वितरण आणि वसुली दरम्यानही नियमांपेक्षा जास्त रोखे वापरत आहे. याशिवाय ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही पारदर्शकता ठेवली जात नव्हती.


ग्राहकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो


या सर्व पद्धतींचा IIFL फायनान्सच्या ग्राहकांच्या हितावर परिणाम होत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या अधिकाऱ्यांसह आरबीआय या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यामध्ये काही सुधारणा होत नसल्याने आरबीआयने आता कारवाई केली आहे. 


 






ही बातमी वाचा: