मुंबई : शेअर बाजारात (Share Market) सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान एका कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. या स्टॉकच्या शेअर दरात  गेल्या 7 दिवसांत 12 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या शेअर दराच्या घसरणीसाठी नवरा-बायकोचे भांडण जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. नवरा-बायकोच्या भांडणाने मात्र गुंतवणुकदारांच्या जीवाला घोर लागला आहे. हा शेअर जगातील सर्वात मोठी सूट फॅब्रिक कंपनी रेमंड लिमिटेडचा (Raymond Ltd) आहे. 


रेमंडच्या शेअर्स दरात (Raymond Ltd Share Price) सातत्याने घसरण होत आहे. या शेअरच्या घसरणीमागे पती-पत्नीमधील मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. रेमंड कंपनीचे अध्यक्ष गौतम सिंघानिया (Gautam Singhania) आणि त्यांची पत्नी नवाज मोदी (Nawaz Modi Singhania) यांनी नुकतेच वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या बातमीनंतर रेमंडच्या शेअर्समध्ये घसरण होत असल्याचे चित्र आहे. 


शेअर दरात आजही घसरण कायम 


रेमंड कंपनीच्या शेअर्समध्ये आजही घसरण पाहायला मिळाली. आज रेमंडचा शेअर 66 अंकांपेक्षा अधिक घसरणीसह 1,676 रुपयांवर बंद झाला. रेमंड कंपनीचे मार्केट कॅपही घसरले आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 180 दशलक्ष डॉलरने कमी झाले आहे. काही वृत्तांनुसार, नवाज मोदींनी गौतम सिंघानिया यांच्या संपत्तीत 75 टक्के हिस्सा मागितला आहे.  गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलरची असल्याची चर्चा आहे.


गुंतवणुकदारांना पाच वर्षात चांगला परतावा 


रेमंडच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षात रेमंडच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 107 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. हे शेअर्स एका वर्षात 29 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. मात्र, आता शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. 


(Disclaimer : या बातमीद्वारे शेअर्स विक्री अथवा खरेदीचा दिला जात नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. कोणत्याही अभ्यासाशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करू नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांशी चर्चा करा.)


 इतर महत्त्वाच्या बातम्या :