Ram Mandir Earnings: राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा उद्या (22 जानेवारी) संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरामुळं पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही विविध विकासकामं सुरु केली आहे. राम मंदिरामुळं 2025 या वर्षात उत्तर प्रदेश राज्याला 20,000 ते 25,000 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई अपेक्षित आहे. एसबीआयच्या संशोधकांच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. 


राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होणार


उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पानुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये त्याचा कर महसूल 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. एसबीआयच्या संशोधकांच्या मते, 2022 च्या तुलनेत 2024 मध्ये उत्तर प्रदेशमधील पर्यटन खर्च दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानं आणि उत्तर प्रदेश सरकारनं पर्यटन वाढवण्यासाठी उचललेली इतर पावले या वर्षाच्या अखेरीस राज्यातील पर्यटक खर्च 4 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचू शकतो. 2022 मध्ये, देशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. तर विदेशी पर्यटकांनी 10,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2022 मध्ये, 32 कोटी देशी पर्यटक उत्तर प्रदेशात आले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 200 टक्के अधिक आहे. 2022 मध्ये विक्रमी 2.21 कोटी पर्यटक अयोध्येत आले होते. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे.


अर्थव्येवस्थेत वाढ 


एसबीआयच्या अहवालात आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक मापदंडांवर उत्तर प्रदेशच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. यामध्ये महिला श्रमशक्तीचा वाटा वाढणे आणि नवकल्पना आणि निर्यातीतील वाढ यांचा समावेश आहे. 2028 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि उत्तर प्रदेशचा जीडीपी 500 अब्ज डॉलरच्या पुढे जाईल, असे अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेशचा राज्य जीडीपी 2024 च्या आर्थिक वर्षात 24.4 लाख कोटी रुपये म्हणजेच 298 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2028 पर्यंत, यूपी देशाच्या जीडीपीमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. 


महत्वाच्या बातम्या:


अयोध्येत रामाबरोबरच 1.3 लाख नोकऱ्यही येणार, 'या' 20 क्षेत्रात होणार मोठी गुंतवणूक