India GDP News: सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील विकास दराची आकडेवारी जाहीर केली आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.३ टक्के राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या तिमाहीत विकास दर पहिल्या तिमाहीपेक्षा कमी असला तरी तो समाधानकारक मानला जात आहे. गेल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल-जून दरम्यान विकास दर १३.५ टक्के होता. तर गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत विकास दर ८.४ टक्के होता.



चालू आर्थिक वर्षाच्या (2022-23) समीक्षाधीन तिमाहीत विकास दरासाठी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात, अर्थशास्त्रज्ञांनी तो 6.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. तर आरबीआयने गेल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर जवळपास समान राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. 


आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत, जीडीपी 38.17 लाख कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीत 35.73 लाख कोटी रुपये होता. देशातील GAV (ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड) एप्रिल-जून तिमाहीत 12.7 टक्क्यांच्या तुलनेत समीक्षाधीन तिमाहीत 5.6 टक्के राहिला. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 8.3 टक्के होता असं  जीडीपीचे आकडे जाहीर करताना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सांगितले आहे.


उत्पादन क्षेत्राची वाढ नकारात्मक
आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राचा विकास दर मायनसमध्ये गेला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत ते -4.3 टक्के आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 5.6 टक्के होते. 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत 3.2 टक्क्यांच्या तुलनेत कृषी क्षेत्राचा विकास दर 4.6 टक्के राहिला आहे. बांधकाम क्षेत्राचा विकास दर 6.6 टक्के राहिला आहे तर 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत तो 8.1 टक्के होता.

इतर क्षेत्रांचा विकास दर 
वीज, गॅस आणि इतर उपयोगिता क्षेत्राची वाढ मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 8.5 टक्क्यांवरून समीक्षाधीन तिमाहीत 5.6 टक्क्यांवर आली आहे. यावेळी व्यापार आणि हॉटेल क्षेत्राचा विकास दर १४.७ टक्के होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 9.6 टक्के होता. आर्थिक आणि रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास दर वार्षिक आधारावर 6.1 टक्क्यांवरून 7.2 टक्के झाला आहे.