Post Office Monthly Income Scheme : सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येकजण आपापल्या कमाईतील काही भाग बचत करून ठेवतो. आणि तो अशा ठिकाणी गुंतवून ठेवतो की निवृत्तीनंतर देखील उर्वरित आयुष्य आनंदात जाईल, काही उत्पन्नाची व्यवस्था करता येईल. याच संदर्भात, पोस्ट ऑफिस बचत योजना खूप लोकप्रिय आहेत. यामध्ये समाविष्ट असलेल्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला दरमहा 9 हजार रूपये नियमित उत्पन्न मिळू शकतात.
पोस्ट ऑफिस योजना : सुरक्षित गुंतवणूक
पोस्ट ऑफिस बचत योजनांना भारतात जास्त प्राधान्य दिले जाते. याचबरोबर, प्रत्येक वयोगटासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. म्हणजेच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या योजनांचा लाभ घेता येतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळेल आणि तुमचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित राहतील.
5 वर्षांसाठी करावी लागणार गुंतवणूक
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे तर सुरक्षित आहेतच पण व्याजही बॅंकांपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिस मासिक सेव्हिंग स्किममध्ये तुम्ही एका खात्याद्वारे किमान 1 हजार रूपये आणि कमाल 9 लाख रूपये गुंतवू शकता. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर त्यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाख रूपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच पती-पत्नी दोघे मिळून 15 लाख रूपयांपर्यंत संयुक्त खात्यात गुंतवणूक करू शकतात. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक गुतंवणूक करू शकतात.
गुंतवणुकीद्वारे 'इतके' व्याज मिळते
तुम्हाला निवृत्तीनंतर किंवा त्यापूर्वी मासिक उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक सुरु करू शकता. या बचत योजनेवर सरकार सध्या 7.4 टक्के दराने वार्षिक व्याज देत आहेत. योजने अंतर्गत, गुंतवणुकीवर मिळणारे हे वार्षिक व्याज 12 महिन्यांत वितरित केले जाते. आणि त्यानंतर तुम्हाला ही रक्कम दरमहा मिळत राहते. तुम्ही मासिक पेसे न काढल्यास ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहतील आणि तुम्हाला हे पैसे मूळ रकमेसह जोडून आणखी व्याज मिळेल.
तुम्हाला दरमहा 9 हजार रूपयांहून अधिक मिळतील
आता तुम्हाला दरमहा 9 हजार रूपयांपेक्षा जास्त नियमित उत्पन्न हवं असेल, तर त्यासाठी तुम्हाला संयुक्त खातं (joint Account) सुरु करावं लागेल. समजा तुम्ही त्यात 15 लाख रूपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 7.4 टक्के व्याजाची रक्कम 1.11 लाख रूपये होईल. आता जर तुम्ही ही व्याजाची रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत समान प्रमाणात विभागली तर तुम्हाला दरमहा 9,250 रूपये मिळतील. जर तुम्ही एकल खाते उघडून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर या योजनेत जास्तीत जास्त 9 लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 66,600 रूपये व्याज मिळतील म्हणजेच दरमहा 5,550 रूपये उपलब्ध होतील.
POMIS खातं कुठे उघडता येईल?
पोस्ट ऑफिसच्या इतर बचत योजनांप्रमाणे, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खातं उघडणं देखील खूप सोपं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खातं सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खात्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल आणि भरलेल्या फॉर्मसह खाते उघडण्यासाठी तुम्हाला विहित रक्कम रोख किंवा चेकद्वारे जमा करावी लागेल. या योजनेत खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Tax Free Countries: जगातील 'हे' देश आहेत करमुक्त, जाणून घ्या सविस्तर माहिती