PMC Bank Merger : आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक (PMC Bank) खातेदारांच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने पीएमसी बँकेचे 'युनिटी स्मॉल फायनान्स बँके'त विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो खातेदारांना दिलासा मिळाला आहे. आता पीएमसी बँकेचे कामकाज पुन्हा सुरळीत करण्याची जबाबदारी युनिटी स्मॉल फायनान्स बँकेवर असणार आहे. 


रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकच्या विलीनीकरणाबाबत आदेश प्रसिद्ध केला आहे. या आदेशानुसार, पीएमसी बँकेची मालमत्ता, ठेवी, देणी, मालमत्ता या अटींसह युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन करण्यात येणार आहेत. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडून तात्काळ पीएमसी बँकेतून कामकाज सुरू करणार आहेत. त्यामुळे पीएमसी बँकेच्या शाखा, कार्यालयांचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत रुपांतर होणार आहे.


पीएमसी बँकेसाठी रिझर्व्ह बँकेने मागवले होते प्रस्ताव


पीएमसी बँकेच्या विलीनीकरणासाठी रिझर्व्ह बँकेने प्रस्ताव मागवले होते. डिसेंबर 2020 याबाबतची प्रक्रिया पार पडली. सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि भारत पे यांच्या संयुक्त कंपनीला बँकिंग परवाना मिळाला होता. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली. 


खातेदारांना दिलासा 


डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत पुढील 10 वर्षांमध्ये पीएमसी बँकेच्या किरकोळ ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने विम्याची रक्कम मिळणार आहे. पीएमसी बँकेकडे 31 मार्च 2020 च्या  अखेरीस 10727.12 कोटींच्या ठेवी होत्या. बँकेने 4472.78 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. तर, 3518.89 कोटींचे कर्ज बुडीत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha