Types Of Provident Fund : भविष्य निर्वाह निधी ही निवृत्ती योजना आहे. सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते संघटित क्षेत्रातील खासगी कर्मचाऱ्यांपर्यंत वेगवेगळे भविष्य निर्वाह निधी आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम साधने लोकांच्या पसंतीस पडत आहेत. यामध्ये आपल्या पैशांवर किती व्याज मिळतं आणि हे लोकांच्या पसंतीस का पडतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.


भविष्य निर्वाह निधीचे तीन प्रकार :


1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, (EPF)
2. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, (PPF)
3. सामान्य भविष्य निर्वाह निधी, (GPF)


या खात्यांमध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. तीन भविष्य निर्वाह निधीमध्ये काय फरक आहे आणि EPF, PPF आणि GPF योजनांमध्ये किती व्याज मिळतं हे सविस्तर जाणून घेऊया.


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees' Provident Funds) (EPF)


कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये अशा कंपन्यांचा समावेश होतो जेथे 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. म्हणजे पगारदार वर्गासाठी ईपीएफ खातं उघडलं जातं. यामध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) खाते नियंत्रित केलं जातं. प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे भविष्य निर्वाह निधी खाते आहे. यामध्ये तुमच्या पगारातून ठराविक भाग कापला जातो. यात, नियोक्त्याच्या (Employer) वतीने या खात्यात समान हिस्सा देखील ठेवला जातो. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी EPF वर 8.50 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याची माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या आर्थिक वर्षापर्यंत ईपीएफवर 8.65 टक्के व्याज मिळत होते. ईपीएफ वरील व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. कामगार मंत्रालयाने हे सूचित केले आहे.


सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund ) (PPF)


पीपीएफ ही सरकारची छोटी बचत योजना आहे. ही योजना सर्वसामान्यांसाठी आहे. त्यात खाते उघडून कोणीही पैसे जमा करू शकतो. हा एक प्रकारचा बचत निधी आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये पीपीएफ खाते उघडू शकता. तुम्हाला पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागतील. या खात्यात जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत आयकर कपातीचा लाभ मिळतो. एप्रिल ते जून 2020-21 या तिमाहीसाठी 7.1 टक्के व्याज मिळेल. पीपीएफ वरील व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते.


सामान्य भविष्य निर्वाह निधी (General Provident Fund) (GPF)


जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) खाते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. जीपीएफ फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. हे एक प्रकारचे निवृत्तीनंतर केलेले पैशासाठी नियोजन आहे. कारण, त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळते. सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 15 टक्के GPF खात्यात योगदान देऊ शकतात. या खात्याचे 'अ‍ॅडव्हान्स' हे फीचर सर्वात खास आहे. यामध्ये कर्मचारी गरज पडल्यास जीपीएफ खात्यातून निश्चित रक्कम काढू शकतो आणि नंतर जमा करू शकतो. यावरही कोणताही कर नाही. 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या तिमाहीसाठी सरकारने GPF चा व्याजदर 7.1 टक्के केला आहे. या योजनेत व्याज देखील तिमाही आधारावर निश्चित केले जाते.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha