PM Narendra Modi invested in Post Office Scheme: नवी दिल्ली : देशाच लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे वाहत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून (Varanasi) तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मोदींनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करत त्यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर मोदींच्या संपत्तीबाबत देशातच नाहीतर जगभरात चर्चा सुरू होत्या. अशातच प्रतिज्ञापत्रातून पंतप्रधान मोदींनी त्यांनी केलेल्या गुंतवणुकींबाबतही माहिती दिली. महत्त्वाची आणि लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, मोदींच्या प्रतिज्ञापत्रात पोस्‍ट ऑफिसच्या (Post Office Scheme) योजनांचा उल्लेख होता. 


पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट (National Savings Certificate- NSC) या योजनेतील गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती. पंतप्रधानांनी या योजनेत 9.12 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. NSC ही एक ठेव योजना आहे, ज्यामध्ये रक्कम 5 वर्षांसाठी गुंतवता येते. सध्या या योजनेवर 7.7 टक्के इतका व्याजदर आहे. मोदींप्रमाणेच तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करू शकता आणि उत्तम परतावा मिळवू शकता. 


'नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट' योजनेसंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी 


कोणताही भारतीय नागरिक नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत जॉईंट अकाउंटचीही सुविधा आहे. तसेच, दोन किंवा तीनजणही जॉईंट अकाउंट ओपन करुन या योजनेत गुंतवणूक करू शकता. 


याशिवाय तुम्हाला जर अपत्य असेल आणि ते अल्पवयीन असेल तर पालक म्हणून तुम्ही त्याच्या नावावर गुंतवणूक करू शकता. तर 10 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या नावावर NSC खरेदी करू शकतात. तुम्ही एकाच वेळी अनेक NSC खाती देखील उघडू शकता. NSC मधील गुंतवणूक किमान एक हजार रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. आणि कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. म्हणजेच, तुम्ही त्यात कितीही कमाल रक्कम गुंतवू शकता. या योजनेवर 80C अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध आहे.


NSC मध्ये मोदींनी केलेल्या गुंतवणुकीवर किती मिळणार रिटर्न? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेत 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. जर तुम्हीही मोदींएवढीच रक्कम या योजनेत गुंतवली तर सध्याच्या व्याजदरानुसार, तुम्हाला फक्त 5 वर्षांच्या व्याजातून 4 लाख 9 हजार 519 रुपये मिळू शकतात. म्हणजेच, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 13 लाख 21 हजार 519 रुपये मिळतील. जर तुम्ही 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 4 लाख 4 हजार 130 रुपये व्याज मिळेल आणि 13 लाख 4 हजार 130 रुपये ही तुमची मॅच्युरिटी रक्कम असेल.