पंढरपूर: गोरगरिबांचा विठ्ठल अशी ओळख असणाऱ्या विठुरायाला सातत्याने देशभरातील भक्त मौल्यवान दागिने व वस्तू अर्पण करत असतात . पंढरपूरच्या (Pandharpur News) विठुरायासोबत (Vitthal- Rukmini) भक्तांचं आणि वारकऱ्यांचं असेलेलं नातं हे शब्दांत कधीही व्यक्त होऊ शकणार नाही, असं आहे. वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायी चालून पंढरपुरात दाखल होतात. ते आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. बा विठुरायाकडे आपलं गऱ्हाणं मांडतात, आपल्या मनातल्या गोष्टी सांगतात आणि काही गोष्टींसाठी ते विनंती करतात, कधी कधी कृतज्ञता व्यक्त करतात.अशाच एका हैद्रबाद येथील भाविकाने विठुरायाला सोन्याचा पाच पदरी हार अर्पण केला आहे.
हैद्राबाद येथील भक्त विजया नायडू यांनी विठुरायाला सोन्याचा पाच पदरी हार अर्पण केला आहे. आकर्षक पद्धतीने बनविलेले हा हार 130 ग्रॅम वजनाचा असून याची किंमत 8 लाख 36 हजार 550 रुपये आहे. विजय नायडू या निस्सीम विठ्ठल भक्त असून पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरात आल्या आणि त्यांनी देवाला हा पाच पदरी सुवर्ण हार अर्पण केला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीय होते . मंदिर समितीच्या वतीने नायडू कुटुंबाचा सत्कार करण्यात आला
विठुरायाला अनोखं दान
विठुराया आणि भक्तांचं असलेल्या अवीट नात्याबद्दल कितीही बोललं तरी कमी ठरणार नाही. विठुरायाचा आशीर्वाद लाभल्यामुळे भरुन पावलेले भक्त सढळ हातांनी आणि खुल्या मनाने दानधर्मही करतात. ते समाजकार्यात स्वत:ला झोकून देतात. किंवा काही भक्त गुप्त दान करुन विठुरायाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. आज देखील पंढरपुरात अशाच एका भक्ताने विठुरायाला अनोखं दान केलं आहे