Share Market : देशांतर्गत शेअर बाजारात आज खळबळ उडाली आहे. युक्रेन-रशिया युद्धाचे पडसाद शेअर बाजारात उमटल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजार 1458 अंकांनी कोसळला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही 387 अंकांची घसरण झाली आहे. तर ICICI बँकेचे शेअर्स उघडताच 4 टक्क्यांनी खाली आले आहेत. सर्व सेक्टोरियल इंडेक्स (Sectorial Index) घसरणीच्या लाल चिन्हात बुडलेले आहेत.
शेअर बाजार कोसळला
देशांतर्गत शेअर बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 1813 अंकांच्या जबरदस्त घसरणीसह 55,418 वर उघडला. तर निफ्टी 514 अंकांच्या घसरणीसह 16,548 वर उघडला आहे.
बाजार उघडताच मोठी पडझड
शेअर मार्केटच्या प्री-ओपनिंग सेशनमध्येच आज बाजारात मोठी पडझड होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. प्री-ओपन सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 1,800 अंकांपेक्षा जास्त म्हणजेच, 3.15 टक्क्यांनी घसरला होता. NSE निफ्टीतही 500 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 1300 हून अधिक अंकांची घसरणीत झाली. सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 55,750 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 350 हून अधिक अंकांनी घसरून 16,700 च्या खाली आला होता.
बाजारात सातत्यानं घसरण
यापूर्वी बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात चांगली उसळी पाहायला मिळाली होती. मात्र संध्याकाळपर्यंत बाजारातील तेजी निवळल्याचं पाहायला मिळालं. दिवसभराचा व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही तोट्यात होते. व्यवहार संपला तेव्हा सेन्सेक्स 68.62 अंकांनी (0.12 टक्के) घसरून 57,232.06 अंकांवर होता. NSE निफ्टी देखील 28.95 अंकांच्या (0.17 टक्के) घसरणीसह 17,063.25 वर होता. अशाप्रकारे सलग सहाव्या दिवशी मोठ्या घसरणीसह बाजार बंद झाला.
अखेर युद्धाला तोंड फुटले
रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. एएपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Russia Ukraine War : अखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha