Russia Ukraine War : युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी केल्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनमधील डोन्बास प्रांतावर हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये ही स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. रशियन लष्कराने कारवाईसाठी डोन्बास प्रांत का निवडला जाणून घ्या...


युक्रेन पूर्वमधील डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) हे प्रांत रशियाने स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले आहेत. या दोन्ही भागांना डोन्बास असे म्हणतात. डोन्बासमध्ये रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांचे वर्चस्व आहे. वर्ष 2014 पासून हा भूभाग युक्रेन सरकारच्या नियंत्रणाबाहेर असून त्यांनी स्वत: ला स्वतंत्र प्रजासत्ताक घोषित केले आहे. या भूभागाला रशिया आणि बेलारूसने मान्यता दिली आहे. डोन्बासमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 15000 लोकांचा मृत्यू झाला असल्याचा युक्रेन सरकारने दावा केला आहे.


आठ लाख नागरिकांकडे रशियन पासपोर्ट


रशियन सरकार डोन्बासमधील भागातील नागरिकांना अनेक प्रकारची मदत करते. यामध्ये गुप्त पद्धतीने लष्करी मदत, आर्थिक मदत, कोरोना लशीचा पुरवठा आदींचा समावेश आहे. त्याशिवाय, या प्रांतात वास्तव्य करणाऱ्या जवळपास आठ लाख नागरिकांकडे रशियन पासपोर्ट असल्याचे म्हटले जाते. डोन्बासमध्ये रशियन भाषिक नागरिकांची संख्या अधिक आहे. या नागरिकांचा ओढा रशियाकडे आहे. तर, युक्रेन सरकार या लोकांना फुटीरतावादी असल्याचे मानते. युक्रेन सरकारकडून या भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करण्यात येतो असा आरोप रशियाकडून करण्यात येतो. 


युक्रेनमध्ये पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याने सत्ता बदल झाला असल्याचा आरोप रशियाकडून करण्यात येतो. पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्यावर असलेले सरकार युक्रेन सरकार डोन्बासमध्ये हिंसाचार करत असल्याचा आरोप रशियाकडून करण्यात येतो. 


सोव्हिएत महासंघाचा भाग होता युक्रेन


युक्रेन हा देश 1990 पर्यंत सोव्हिएत महासंघाचा भाग होता. सोव्हिएत महासंघाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला. युक्रेनच्या वाट्याला सोव्हिएत महासंघाच्या काळात विकसित करण्यात आलेले महत्त्वाचे बंदर, लष्करी विभाग आले. स्वतंत्र्यानंतर युक्रेनचे रशियासोबत चांगले संबंध होते. वर्ष 2014 पर्यंत व्हिक्टर यानुकोविच राष्ट्रपतीपदावरून हटण्याआधी रशियासोबत चांगले संबंध होते. मात्र, त्यांच्या पश्चात आलेल्या सरकारने रशियाविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे युक्रेनमधील रशियन भाषिक प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: