Petrol-Diesel Price: नवी दिल्ली : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईनं सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. अशातच लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) कमी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Rate) सातत्यानं घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सातत्यानं घसरणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरांमुळे भारतीय तेल कंपन्यांना मात्र नफा मिळत असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच इंधन दरांत कपात होण्याची शक्यता असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, ICRA चा अंदाज आहे की, OMCs ला नफा आंतरराष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पेट्रोलसाठी प्रति लिटर 11 रुपये आणि डिझेलसाठी 6 रुपये अधिक आहे. या नफ्यांमुळे सप्टेंबर 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर काही महिन्यांत पेट्रोलचं (Petrol) व्यापार मार्जिन सुधारलं आहे. त्याचवेळी, ऑक्टोबरनंतर डिझेलच्या (Diesel) मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे, अशी माहिती ICRA लिमिटेडचे समूह प्रमुख गिरीशकुमार कदम यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काय?
बेंचमार्क कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या खाली व्यवहार करत आहेत, कारण लिबिया आणि नॉर्वेमधील वाढत्या उत्पादनासह कमकुवत मागणीमुळे पश्चिम आशियातील व्यापक संघर्षाची भीती अंशतः कमी झाली आहे.
सध्याचे पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today)
IOCL नुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्रालयानं सांगितलं होतं की, भारत त्या सर्व देशांमधून कच्चे तेल आयात करेल ज्यावर बंदी नाही. डिसेंबर महिन्यात 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतरच पेट्रोलियम मंत्रालयानं ही घोषणा केली होती. त्यामुळे आता भारतात कच्चं तेल व्हेनेझुएलाहून आयात करण्याची शक्यता आहे. भारतात 3 वर्षांनंतर व्हेनेझुएला येथून कच्च तेल आयात होण्याची शक्यता वाढली आहे. व्हेनेझुएलातून कच्चं तेल आयात करण्यावर लादलेले आर्थिक निर्बंध 2019 मध्ये उठवण्यात आले आहेत. कमोडिटी मार्केट ॲनालिटिक्स फर्म कॅप्लरच्या मते, व्हेनेझुएलामधून तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये कच्च्या तेलाची भारतात आयात करण्यात आली होती.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहे, यातून कोणताही दावा करण्याचा हेतू नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :