Fuel Price : देशभरात उसळलेल्या महागाईच्या आगडोंबामुळे सामान्यांना जगण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरवाढीचा परिणाम विक्रीवरही जाणवत आहे. एप्रिल महिन्यात एलपीजी गॅसच्या विक्रीत घट झाली आहे. तर, पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत किंचीत वाढ झाल्याचे चित्र आहे. इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. त्याचा परिणाम मागणीवरदेखील होत आहे.
एलपीजीच्या मागणीत वाढ
मार्च 2022 च्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये पेट्रोलच्या विक्रीत 2.1 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर, डिझेलच्या मागणी स्थिर राहिल्याचे चित्र आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेल्या एलपीजी गॅसची मागणी लॉकडाऊनच्या काळात वाढत होती. आता मात्र, एलपीजीच्या मासिक विक्रीत 9.1 टक्क्यांची घट झाली आहे.
22 मार्च रोजी साडे चार महिन्यानंतर दरवाढ
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 22 मार्च रोजी वाढ केली होती. जवळपास साडेचार महिने इंधन दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्यानंतर 6 एप्रिलपर्यंतच्या 16 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 10 रुपयांची वाढ करण्यात आली.
एलपीजीच्या दरात वाढ
घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात 22 मार्च रोजी 50 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर एलपीजी गॅस सिलेंडरच्या दराने 950 रुपयांचा आकडा गाठला. या दरवाढीमुळे एलपीजीची मागणी घटली असल्याचे म्हटले जाते.
आकडे काय सांगतात?
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी एप्रिलमध्ये 25.8 लाख टन पेट्रोलची विक्री केली. मागील वर्षी या कालावधीच्या तुलनेत 20.4 टक्के आणि 2019 च्या तुलनेत 15.5 टक्के अधिक आहे. मात्र, मार्च 2022च्या तुलनेत एप्रिल महिन्यातील पेट्रोलची विक्री 2.1 टक्क्यांनी वाढली.
डिझेलच्या विक्रीत वाढ
डिझेलच्या विक्रीत 13.3 टक्क्यांनी वाढ झाली असून 66.9 लाख टन डिझेलची विक्री करण्यात आली. एप्रिल 2019 च्या तुलनेत 2.1 टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, मार्च महिन्यात 66.7 लाख टन इतकी विक्री करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात डिझेल विक्रीत 0.3 टक्क्यांची वाढ झाली.
मार्च महिन्यात दोन वर्षातील सर्वाधिक इंधन विक्री
मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलची विक्री अनुक्रमे 18 टक्के आणि 23.7 टक्क्यांनी वाढली. एप्रिलमध्ये एलपीजीचा वापर मासिक आधारावर 9.1 टक्क्यांनी घसरून 2.2 दशलक्ष टनांवर आला आहे, एप्रिल 2021 च्या तुलनेत 5.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.