Ganesh Naik : भाजप (BJP) नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयानं गणेश नाईकांचा जामीन नाकारल्यानंतर कोणत्याही क्षणी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
भाजप नेते गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाणे सत्र न्यायालयाने (Thane District & Sessions Court) नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. बेलापूर आणि नेरुळ इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी याचिका गणेश नाईक यांनी दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयानं निकाल आजसाठी राखून ठेवला होता. दरम्यान आज न्यायालयानं दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गणेश नाईक यांच्यासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या एका महिलेनं तब्बल 27 वर्षांनी बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे. तर रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेनं स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. नेरुळच्या गुन्ह्यासंदर्भात अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याचे या महिलेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासही सुरुवात करुन या महिलेची वैद्यकीय चाचणीही केली. त्यानंतर नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता. ही सुनावणी न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात घेण्यात आली.
संशयित आरोपीची डीएनए टेस्ट करण्यात यावी, फिर्यादीच्या वकिलांची मागणी
अत्याचार प्रकरणात संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे, त्यामुळे संशयित आरोपीची डीएनए टेस्ट करण्यात यावी अशी मागणी फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयासमोर केली होती. तर डीएनए चाचणी करण्यास नाईक तयार असून त्यासाठी कस्टडीची गरज नाही असा युक्तिवाद नाईकांच्या वकिलांनी न्यायालयासमोर बुधवारी केला होता. त्यानंतर शनिवारी ठाणे न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्यासमोर अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद लक्षात घेऊन आमदार नाईकांचा दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच नाईकांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ देण्यात यावा व सात दिवस अटक करू नये अशी मागणी केली. ती मागणीही न्यायालयाने अमान्य केली. त्यामुळे गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.