Gratuity Rule: खाजगी क्षेत्रात (Private Sector) काम करणाऱ्या लोकांच्या मनात ग्रॅच्युइटीशी (Gratuity) संबंधित अनेक प्रश्न सतत घोळत असतात. कंपनीत सलग पाच वर्ष काम केल्यावरच ग्रॅच्युइटी मिळते, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पण आता यासंदर्भातही सरकार मोठा निर्णय लवकरच घेऊ शकते. सरकारकडून यासंदर्भातील संकेतही मिळत आहेत. केंद्र सरकार नव्या लेबर कोडमध्ये (New Labour Code) ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी दिली जाते.


प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात आणि विशेषतः नव्यानं रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मनात ग्रॅच्युइटीसंदर्भात अनेक प्रश्न असतात. प्रत्येकाला ग्रॅच्युइटीचा अधिकार आहे का? सलग काही वर्ष कंपनीसाठी काम केल्यामुळं आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देऊन कंपन्या कृतज्ञता व्यक्त करतात. पेमेंट आणि ग्रॅच्युइटी कायदा देशातील सर्व कारखाने, खाणी, तेल क्षेत्र, बंदरं आणि रेल्वे यांना लागू आहे. तसेच, ज्या कंपन्या किंवा दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त लोक काम करतात, त्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. कोणत्याही कंपनीत पाच वर्ष सतत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीसाठी पात्र मानलं जातं. परंतु काही प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी दिवसांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते.


5 वर्षांपेक्षा कमी कालावधी काम केल्यानंतरही मिळते ग्रॅच्युइटी


ग्रॅच्युइटी कायद्याच्या (Gratuity Act) कलम-2A मध्ये 'सलग काम करणं' अशी याची स्पष्ट व्याख्या केली आहे. त्यानुसार, पाच वर्ष काम न केल्यानं अनेक कर्मचारी ग्रॅच्युइटीचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2 अ नुसार, भूमिगत खाणींमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी त्यांच्या एम्प्लॉयरसोबत चार वर्ष सलग 190 दिवस काम केलं, तर ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात.


त्याचप्रमाणे इतर संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी चार वर्ष 240 दिवस (म्हणजे 4 वर्ष 8 महिने) काम केल्यानंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र असतात. नोटिस कालावधी ग्रॅच्युइटीमध्ये देखील जोडला जातो, कारण नोटिस कालावधी 'सलग सेवा'मध्ये गणला जातो.


कसं होतं ग्रॅच्युइटीचं कॅल्क्युलेशन? 


एखाद्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युटी मिळणार हे कसं ठरतं? याचं एक समीकरण ठरलेलं आहे. कर्मचाऱ्याची एकूण ग्रॅच्युटीची रक्कम = (कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार) x (15/26) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या). समजा तुम्ही एकाच कंपनीत सलग सात वर्षे काम केलं आणि तुमचा शेवटचा पगार हा 35 हजार रुपये आहे (मूळ वेतन आणि महागाई भत्त्यासह). तर ग्रॅच्युटीच्या कॅल्क्युलेशनुसार, (35000) x (15/26) x (7) = 1,41,346 रुपये इतकी ग्रॅच्युटी तुम्हाला मिळू शकते.


एका कर्मचाऱ्याला अधिकाधिक 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटी मिळू शकते. ग्रॅच्युइटी म्हणून मिळणारी रक्कम करमुक्त असते. म्हणजेच, कोणत्याही कर्मचाऱ्याला मिळालेल्या ग्रॅच्युटीवर कोणताही कर भरावा लागत नाही. हा नियम सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होतो.