Home Loan EMI: दीर्घकालीन मुदतीसाठी कर्ज घेतलेल्या ग्राहकांना आता काही वर्ष कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहे. जर, तुम्ही 20 वर्षांसाठी गृह कर्ज (Home Loan) घेतले असेल तर आता तुम्हाला 24 वर्षांसाठी कर्जाचा हप्ता भरावा लागणार आहे. मागील पाच महिन्यात गृह कर्जाचा दर (Home Loan Interest Rate) हा 6.5 टक्क्यांहून 8.25 टक्के इतका झाला आहे.
वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो दरात वाढ (Repo Rate Hike) करण्यात येत आहे. मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत चार वेळेस रेपो व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. रेपो दरात वाढ झाल्याने कर्जेदेखील महाग झाली आहेत. वैयक्तिक, शैक्षणिक, गृहकर्ज आदी कर्जांचा समावेश आहे.
रेपो दरात वाढ
एप्रिल महिन्यात रेपो दर हा 4 टक्के होता. त्यावेळी गृह कर्जावरील व्याज दर 6.7 टक्के इतका होता. त्यानुसार 20 वर्षाच्या मुदतीसाठी 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी 7574 रुपये हप्ता भरावा लागत होता. एप्रिल 2022 नंतर रिझर्व्ह बँकेने मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रेपो दर वाढ केली. त्या प्रमाणात गृह कर्जाचा दरदेखील वाढला. मे महिन्यात रेपो दर 4.4 टक्के होता. त्यावेळी गृह कर्जाचा दर 7.1 टक्के झाला होता. जून महिन्यात 4.9 टक्के रेपो दर असताना 7.6 टक्के होता. ऑगस्ट महिन्यात रेपो दर 5.4 टक्के आणि सप्टेंबर महिन्यात 5.9 टक्के इतका झाला. त्यावेळी गृह कर्जाचा दर अनुक्रमे 8.1 टक्के आणि 8.6 टक्के इतका झाला. 20 वर्षांच्या मुदतीसाठी घेतलेल्या 10 लाखांच्या कर्जासाठी 8.6 टक्के दराने 8741 रुपयांचा EMI झाला आहे.
कर्ज परतफेडीची मुदत वाढणार
सर्वसाधारणपणे, बँकांकडून ईएमआय स्थिर ठेवला जातो. परंतु कर्जाचा कालावधी वाढवला जातो. रेपो दर वाढीचा व्याज दरावर परिणाम होतो. त्यामुळे रेपो दर वाढल्यानंतर तुमचा ईएमआय स्थिर असला तरी त्याच्या हप्त्यांच्या कालावधीमध्ये वाढ होते. थोडक्यात तुम्ही व्याजाची अधिक रक्कम बँकेला अधिकच्या वर्षात परतफेड करत असता.
कर्जाची परतफेड लवकर करता येईल का?
कर्जावरील व्याज दरात वाढ होत असल्याने कर्ज परतफेडीचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत अथवा मुदतीआधीच कर्जाची परतफेड करता येणे शक्य आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कर्ज लवकर परतफेडीसाठी तुम्ही दरवर्षी EMI मध्ये 10 टक्क्यांची वाढ करू शकता. त्यामुळे 25 वर्षासाठी घेतलेले 50 लाखांचे कर्ज 10 वर्ष दोन महिन्यात परतफेड करता येईल. दरवर्षी EMI मध्ये 5 टक्क्यांनी वाढ केल्यास तुमचे कर्ज 13 वर्ष 3 महिन्यात फेडले जाईल. दरवर्षी तुम्ही एक अतिरिक्त EMI भरल्यास 19 वर्ष तीन महिन्यात कर्ज परतफेड होईल.