मुंबई : जमिनीची किंमत नेहमीच वाढत राहते. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये (Real Estate Investment) फार पूर्वीपासून माणसं गुंतवणूक करताना दिसतात. योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास रिअल इस्टेटमध्ये चांगला परतावा मिळू शकतो.
कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत नीट माहीती घेणे आवश्यक असते, त्याच प्रमाणे रिअल इस्टेटमध्ये देखील गुंतवणूक करण्याआधी काही बाबी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. निवासी किंवा रेसिडेंशिअल मालमत्तेतील गुंतवणूक आणि अनिवासी किंवा कमर्शिअल मालमत्तेतील गुंतवणूक असे स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीचे मुख्य दोन प्रकार आहेत. त्यापैकी कमर्शिअल मालमत्तेतील गुंतवणुकीवर जास्त फायदा मिळतो.
गुंतवणुकींसाठी महत्वाच्या गोष्टी
मालमत्तेच्या सभोवतीचा परिसर
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा जसे की शाळा, बाजारपेठ, दवाखाना, विमानतळ यांचे आपल्या मालमत्तेच्या ठिकाणाहून अंतर जवळ असावे. त्यातच बरोबरच तिथे असलेली रहदारी या बाबी लक्षात घ्याव्यात.
रिअल इस्टेटची रचना आणि गुणवत्ता
रिअल इस्टेटची रचना आकर्षक असावी आणि त्याचबरोबर उत्तम दर्जाचे फिनिशिंग असावे. त्याच बरोबर अत्याधुनिक बांधकाम तंत्र आणि उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य असल्यास बांधकाम मजबूत होते. देखरेखीचा खर्च कमी होतो. अशा प्रकारे आपल्या रिअल इस्टेटचे मूल्य वाढण्यास मदत होते.
पुनर्विक्री आणि भाडेतत्त्वावर जागा देणे
पुनर्विक्री करताना आणि भाडेतत्त्वावर आपली रिअल इस्टेट देताना रिअल इस्टेटच्या भोवतीचा परिसर त्याचबरोबर बांधकामाच्या गुणवत्तेवरून भाडे जास्तीत जास्त आकारले जाऊ शकते. पुनर्विक्री करतानासुद्धा विक्रीची किंमत या दोन निकषांवर आधारित असते.
कर आकारणी बद्दल माहिती घ्या
रिअल इस्टेटमधील उत्पन्नावर सरकार कर आकारते याची माहिती असणे आवश्यक असते. भाडे उत्पन्नावर दुरुस्ती व देखभाल खर्चाची वजावट मिळते. त्याचप्रमाणे विक्री करताना मालमत्तेवर घसाऱ्याची वजावट मिळते. याबरोबर नवीन आलेल्या रेरा कायद्यामुळे रिअल इस्टेटशी निगडीत कायदेशीर बाबी, जागेचा इतिहास, पूर्व मालक यांची माहिती देखील मिळण्यास फायद्याचे ठरते. ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याविषयी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणत्या प्रकारच्या मालमत्तेतून किती परतावा मिळू शकतो याची माहिती घेऊन मगच गुंतवणूक करावी.
व्यावसायिक मालमत्तेचे प्रकार
कार्यालय/ ऑफिस
आपल्या सर्वांना माहीत आहे की कार्यालये ही एक प्रकारची व्यावसायिक इमारत असते. कार्यालयीन इमारतींचे आणखी तीन अ, ब आणि क असे उपवर्गीकरण केले जाऊ शकते.
अ वर्गाची कार्यालये मुख्य ठिकाणी वसलेली असतात. त्यात असलेल्या सुख सुविधांमुळे त्यांचा अ वर्ग असतो त्यांचे भाडे ब आणि क पेक्षा जास्त असते. ब वर्गाची कार्यालये बऱ्यापैकी चांगली लोकवस्ती असते तिथे वसलेली असतात. त्यांचे भाडे अ वर्गा पेक्षा कमी असते. क वर्गाची कार्यालये ग्रामीण भागा जवळ किंवा निमशहरी भागात वसलेली असतात त्यांचे भाडे अ आणि ब वर्गाच्या तुलनेत कमी असते. ग्रामीण भागाजवळचे एखादे हॉटेल किंवा वैद्यकीय इमारत हे त्याचे उदाहरण आहे.
रिटेल
तुम्ही शॉपिंग मॉल्स, दुकानाचे गाळे, बँकांचा गोडाऊन, त्याचबरोबर त्या इमारती जिथे फक्त व्यावसायिक काम चालते यांचा रिटेलचा भाग म्हणून विचार करता येईल.
औद्योगिक
जड उत्पादनांची जिथे निर्मिती केली जाते, बल्क वेअरहाऊस, कारखाने यांना आपला व्यवसाय करण्यासाठी मोठी जागा हवी असते. या जागांना सुद्धा व्यावसायिक जागा असे म्हणतात.
हॉटेल
कॅसिनो आणि रिसॉर्ट, फूड कोर्ट, पब हे सर्व हॉटेल इंडस्ट्रीचा एक भाग आहेत. यासाठी व्यावसायिक मालमत्तेची आवश्यकता भासते.
हे लक्षात ठेवा
1. रिअल इस्टेट ही एकाचवेळी केली जाणारी गुंतवणूक नाही, वरचेवर देखरेख करणे आवश्यक असते. भविष्यात तुम्ही सांभाळू शकाल अशा मालमत्तेत गुंतवणुक करा.
2. तुम्ही राहत नसलेल्या ठिकाणी रिअल इस्टेट असणे अवघड असू शकते, तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या मालमत्तेवर लक्ष ठेवणारी व्यक्ती नियुक्त करा. तथापि, तुम्ही अधुनमधून भेट देणे ही गरजेचे असते.
3. प्रत्येक कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करा.
4. विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित बातम्यां बद्दल अपडेटेड रहा.
5. निवासी मालमत्तेतून मिळणारा भाडे स्वरूपातील परतावा हा साधारण 2-3% - % असतो तर व्यवसायिक मालमत्तेतून मिळणारा भाडे स्वरूपातील परतावा हा साधारण 6-9% असतो.
6. मोठ्या शहरांमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त भाडे मिळू शकते. त्यामुळे अनेक माणसे मोठ्या संख्येने गावकाकडून शहरात स्थलांतरीत होत असतात, परवडणारी घरे शोधत असतात.
रिअल इस्टेट गुंतवणूक ही पॅसिव्ह इन्कम देऊ शकते. म्हणजेच जर आज रोजी विचारपूर्वक गुंतवणूक केली तर भविष्यात आपल्या भावी पिढ्यांसाठीही ती लाभदायक ठरू शकते. सध्याच्या काळात रिअल इस्टेट गुंतवणूक करताना धोरणात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. रिअल इस्टेट प्रॉपर्टी भाड्याने देताना किंवा जास्त किमतीवर या मालमत्तेची पुनर्विक्री करताना वर दिलेला विश्लेषणात्मक तपशील तुमच्या नक्की कामी येईल.
जतीन सुरतवाला, कार्यकारी संचालक व अध्यक्ष, सुरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड