मुंबई म्युच्युअल फंड हे शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील तेजीचा फायदा तर होतोच, पण पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असल्याने तोटाही कमी होतो. याशिवाय चांगले शेअर्स शोधण्याच्या कामातूनही तुमची सुटका होते. यामुळेच म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला तातडीने महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. 


किती दिवसांचा अवधी?


बाजाराचे नियमन करणारे प्राधिकरण सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मार्च महिन्यात एक परिपत्रक जारी केले होते. परिपत्रकानुसार, म्युच्युअल फंड धारकांना नॉमिनी नाव नोंदणी करण्यासाठीची मुदत निश्चित केली होती. 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. ही मुदत संपण्यास आता दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. 


मुदत संपल्यानंतर काय होणार?


यापूर्वी ही मुदत 31 मार्च 2023 रोजी संपत होती. खरं तर, SEBI ने 15 जून 2022 रोजी या संदर्भात सर्वप्रथम एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर सेबीने 28 मार्च रोजी नवीन परिपत्रक जारी केले आणि 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली. सेबीने स्पष्टपणे सांगितले होते की, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी नॉमिनीबाबत अंतिम मुदतीपर्यंत स्थिती स्पष्ट केली नाही, तर त्यांचे फोलिओ गोठवले जातील.


गुंतवणूकदारांकडे पर्याय काय?


म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या फोलिओचे डेबिट फ्रीझिंग टाळण्यासाठी दोन उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे नामनिर्देशन सबमिट करणे म्हणजे एखाद्याला नॉमिनी बनवणे. दुसरा पर्याय म्हणजे नामांकन रद्द करणे. जर तुम्हाला कोणालाच नॉमिनी करायचे नसल्यास तर तुम्हाला जाहीर करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल. 


म्युच्युअल फंडमध्ये संयुक्त खाते असल्यास पर्याय काय?


जर म्युच्युअल फंड एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र खरेदी केला असेल, म्हणजेच खाते वैयक्तिक नसून संयुक्त असेल, तर अशा परिस्थितीत सर्व संयुक्त धारकांनी एकत्र येऊन नॉमिनी ठरवावे लागेल. 



(Disclaimer: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)



इतर संबंधित बातमी: