SIP Investment: आपण सगळेजण गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने गुंतवणूक करत असतो. कमी गुंतवणूक आणि अधिक चांगला परतावा मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. म्युच्युअल फंडमध्ये बहुतांशीजण एसआयपीद्वारे गुंतवणूक करतात. मात्र, एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan (SIP)) गुंतवणूक करताना काही विशिष्ट तारखांना गुंतवणूक केल्यास त्याचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. बाजारातील अस्थिरतेचा फायदा तुम्हालादेखील होऊ शकतो. या अस्थिरतेत तुम्हाला कमी किंमतीत अधिक युनिट्स मिळू शकतात. त्यामुळे काही ठाराविक तारखांना एसआयपी करावी असे काहीजण म्हणतात. 

म्युच्युअल फंडातील SIP साठी कोणती तारीख सर्वोत्तम आहे?

जेव्हा तुम्हाला तुमच्या SIP गुंतवणुकीसाठी महिन्यातील कोणतीही तारीख निवडण्याचा पर्याय दिला जातो, तेव्हा तारीख निवडणे काहीसं कठीण वाटतं. वेगवेगळ्या गुंतवणूकदारांचे त्यांच्या सोयीनुसार गुंतवणूक करण्याबाबतचे  वेगवेगळे सिद्धांत असतात. काहींच्या मते महिन्याच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे चांगले आहे, तर काहींच्या मते महिन्याच्या शेवटी तुमचे SIP शेड्यूल करणे चांगले आहे. सहसा, महिन्याच्या शेवटी, F&O सेटलमेंट्समुळे बाजार अस्थिर असतात. काही लोकांच्या मते महिन्याच्या मध्यात गुंतवणूक करणे योग्य राहिल.

पण गुंतवणूक करताना SIP तारीख खरोखरच महत्त्वाची आहे का ते पाहू. उदाहरणार्थ  श्री कुमार यांनी त्यांचा गुंतवणूक प्रवास जानेवारी 2010 मध्ये सुरू केला. त्यांनी डिसेंबर 2019 मध्ये त्यांचे SIP बंद केले. ते निफ्टी 100 इंडेक्समध्ये गुंतवणूक करत होते आणि SIP रक्कम प्रति महिना 10,000 रुपये होती. त्याची SIP तारीख 1ली, 5वी, 10वी, 15वी, 20वी, 25वी किंवा 28वी असती तर त्याचे रिटर्न किती वेगळे झाले असते ते पाहू या.

Nifty 100 SIP ची तारीख गुंतवणुकीचे मूल्य Internal Rate of Return
(IRR)
1 ₹20,61,265 10.43%
5 ₹20,63,436 10.47%
10 ₹20,63,049 10.49%
15 ₹20,59,676 10.49%
20 ₹20,57,926 10.50%
25 ₹20,63,601 10.58%
28 ₹20,58,055 10.54%


गुंतवणुकीचे मूल्य (कार्यकाळाच्या शेवटी) पहात असताना, परताव्यात फारसा फरक दिसत नाही. SIP तारखेकडे दुर्लक्ष करून, परतावा जवळजवळ सारखाच असतो. जेथे IRR 10.43% ते 10.54% च्या श्रेणीत चढ-उतार होतो. SIP ची तारीख 25 वी (10.58%) असताना सर्वोच्च IRR होता. सर्वात कमी IRR 1 ला (10.43%) SIP साठी 0.15% चा फरक आहे. 

त्यामुळे SIP ची गुंतवणूक करताना, कोणत्याही तारखेला गुंतवणूक केली तरी त्याचा फारसा फरक पडत नाही, असे दिसून येते. 

एसआयपीच्या तारखेचा फायदा नाही 

आपण दिलेल्या उदाहरणावरून एक बाब लक्षात येते की, SIP गुंतवणुकीसाठी एखादी विशिष्ट तारीख फारशी फायदेशीर नाही. काही फंडांसाठी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम एसआयपी तारीख 1ली असू शकते, तर काहींसाठी पाच तारीख आणि काहींसाठी महिन्यातील 28वी तारीख महत्त्वाची असू शकते. SIP साठी विशिष्ट तारीख सर्वोत्तम आहे हे सांगणे कठीण आहे.

त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करताना तुम्हाला सोयीस्कर अशी तारीख निवडा. जेणेकरून तुम्ही SIP गुंतवणूक कायम राहील, त्याचा हप्तादेखील चुकणार नाही.  

(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)