IPO : अदानी समूहाची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) अदानी कॅपिटलचा आयपीओ आणणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ गौरव गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी ब्लूमबर्गशी केलेल्या संभाषणात कंपनी पहिल्या शेअर विक्रीमध्ये सुमारे 10 टक्के हिस्सा देऊ करेल अशी माहिती दिली. कंपनीचे मूल्यांकन लक्ष्य दोन अब्ज डॉलर आहे.
अदानी कॅपिटल या आयपीओद्वारे 1,500 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. 2024 पर्यंत आयपीओ आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची अदानी कॅपिटलमधील गुंतवणूक ही लक्षात घेण्यासारखी आहे. अदानी समूहाच्या 7 कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. यापैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटींहून अधिक आहे. या समूहाची शेवटची सूची अदानी विल्मार होती. जी यावर्षी फेब्रुवारीमध्ये सूचीबद्ध झाली. विल्मरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. अदानी विल्मार ही या समूहातील एकमेव सूचीबद्ध कंपनी आहे ज्याचे मार्केट कॅप रु. 1 लाख कोटींपेक्षा कमी आहे.
भांडवल उभारण्याची क्षमता वाढली
लिस्ट केल्यानंतर कंपनीची भांडवल उभारणी करण्याची क्षमता वाढते. तंत्रज्ञानाच्या मदतीने अदानी कॅपिटलला 3 लाख ते 30 लाख कर्ज क्षेत्रात आपली पकड मजबूत करायची आहे. तंत्रज्ञान वापरणारी क्रेडिट कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकते असं गौरव गुप्ता यांनी सांगितले.
2017 पासून व्यवसाय सुरु
अदानी कॅपिटलने 2017 मध्ये कर्ज देण्याचा व्यवसाय सुरू केला. कंपनी ग्रामीण आणि किरकोळ वित्त क्षेत्रात सक्रिय आहे. कंपनी कृषी उपकरणे, छोटी व्यावसायिक वाहने, तीनचाकी वाहने आणि शेतजमिनीवर कर्जे यासाठी सेवा देत आहे.
आठ राज्यांत व्यवसाय
अदानी कॅपिटलचे सीईओ म्हणाले, कंपनीचा व्यवसाय थेट ग्राहक वितरण मॉडेलवर आधारित आहे. कंपनीच्या 8 राज्यांमध्ये 154 शाखा आहेत आणि सुमारे 60,000 ग्राहक आहेत. कंपनी सध्या 3,000 कोटी रुपयांच्या कर्जाचे व्यवस्थापन करत आहे आणि तिची एकूण NPA (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) सुमारे 1 टक्के आहे. कंपनीचे कर्ज पुस्तक दरवर्षी दुप्पट करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.