Saving Formula 50/30/20 Rule :  सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्यजण बेजार झाले आहेत. महागाईमुळे वाढत्या खर्चात बचत कशी करायची,  असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे. भविष्यात आर्थिक तंगीला सामोरे जावे लागू नये, अशी प्रत्येकाची इच्छ असते. बचत करणे (Saving), गुंतवणूक (Investment) करणे याबाबत अनेकजणांना प्रश्न पडतो. तुम्हाला खर्चाला मर्यादित करून बचत केल्यास काही एक चांगली रक्कम भविष्यासाठी निर्माण होऊ शकते. त्यानुसार 50:30:20 बचत करावी लागेल. हा फॉर्म्युला बचतीच्या अनुषंगाने आहे. 


उत्पन्नाची 3 भागांमध्ये वाटणी करा


50:30:20 फॉर्म्युला (Saving Formula) स्वीकारून, तुम्ही तुमचे घर चालवताना बचत सुरू ठेवू शकता. जर तुमच्याकडे 100 रुपये असतील तर दर महिन्याला तुम्हाला 50, 30 रुपये आणि 20 रुपये यानुसार त्यातील काही भाग वेगळा करावा लागेल. 


उदाहरण म्हणून, आता महिन्याला 40,000 रुपये तुमचे उत्पन्न असल्यास तुमच्या पगाराची वाटणी पुढीलप्रमाणे असेल. तुमचा पगार, 20000+12000+8000 रुपये तीन भागांमध्ये विभागून घ्या. तुमच्या उत्पन्नाचे फक्त तीन भाग केल्याने तुम्ही करोडपती होणार नाही हे लक्षात घ्या. 


पहिला हिस्सा कुठं खर्च करावा?


आपल्या खर्चापैकी, अत्यावश्यक आणि टाळता न येणारे खर्च असतात. आपल्या उत्पन्नांपैकी सर्वात मोठा आणि पहिला हिस्सा 20 हजार रुपये हे खाणे, पिणे, राहणे, शिक्षण, EMI आदी बाबींसाठी खर्च करता येईल. राहणे याचा अर्थ तुमचे घरभाडे अथवा होमलोनचा हप्ता. तुम्ही हा भाग दुसऱ्या बचत खात्यात ठेवून त्याच्या मार्फत खर्च करू शकता. तुम्हाला दर महिन्याला तुमच्या खर्चाची यादी अपडेट करावी लागेल आणि होणाऱ्या प्रत्येक खर्चासाठी निर्धारीत करावी लागेल.


दुसरा हिस्सा कुठं खर्च कराल?


आता, दुसरा हिस्सा हा 30 टक्के म्हणजे 12 हजार रुपयांचा आहे.  यामध्ये तुमचा खासगी खर्च करू शकता. यामध्ये पर्यटन, चित्रपट पाहणे, रेस्टोरंट्समध्ये जेवण करणे, गॅजेट्स, कपडे, कार, बाईक आणि औषधोपचार आदी खर्चांचा समावेश करू शकता. लाइफस्टाइलशी संबंधित खर्चदेखील तुम्ही यातून करू शकता. मात्र, यातून खर्च करताना तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. खर्च पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पैशांची गरज तुम्हाला भासता कामा नये.


तिसरा भाग हा गुंतवणुकीसाठी 


तुम्हाला करोडपती बनवण्यात शेवटच्या किंवा सर्वात लहान भागाची भूमिका सर्वात महत्वाची असते. 20 टक्के भाग म्हणजे, जवळपास 40,000 रुपयांपैकी 8,000  ही रक्कम दरमहा बचत करून गुंतवा. ही उरलेली रक्कम म्युच्युअल फंडात दर महिन्याला SIP आणि बाँडमध्ये गुंतवणे सर्वात फायदेशीर ठरेल. या सूत्रानुसार, 40,000 रुपये कमावणारे वर्षाला किमान 1 लाख रुपयांची बचत करू शकतात. तुम्ही ही बचत योग्य ठिकाणी गुंतवता तेव्हा ती वर्षानुवर्षे वाढत जाईल आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजावर चक्रवाढ व्याज मिळेल.


जर तुम्ही ही बचत दररोजच्या आधारावर विभागली तर दररोज सुमारे 266 रुपये होतात. तुम्ही ही रक्कम फक्त 20 वर्षांसाठी SIP मध्ये गुंतवली आणि समजा तुम्हाला 18 टक्के परतावा मिळेल. मग या कालावधीतील तुमची एकूण ठेव 19,20,000 रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला एकूण 1,68,27,897 रुपये परतावा मिळतील. यानुसार, जर आपण एकूण मूल्याबद्दल बोललो तर ते 1,87,47,897 रुपये इतकी होईल. 


निवृत्तीनंतर चिंता नाही


तुम्ही या कालावधीत तुमच्या वाढत्या उत्पन्नांनुसार बचत आणि गुंतवणूक वाढवत नेल्यास ही रक्कम अधिक होईल. या फॉर्म्युल्यानुसार, तुम्ही बचत केल्यास, निवृत्तीनंतर तुमच्याकडे एक चांगला मोठा निधी उपलब्ध असेल. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे प्रामाणिक प्रयत्न आणि त्याच्या जोडीला मजबूत इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.