(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paytm : आयपीओ आधीच पेटीएमची दिवाळी! गुंतवणूकदारांकडून जमवले 8235 कोटी रुपये
PayTM IPO : शेअर बाजारात आयपीओ येण्यापूर्वीच पेटीएमने गुंतवणूकदारांकडून (Anchor investor) 8235 कोटी रुपयांचा निधी जमवला आहे. पेटीएम आयपीओच्या माध्यमातून 18 हजार 300 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.
Paytm IPO : डिजीटल पेमेंट आणि आर्थिक सेवा देणारी कंपनी पेटीएमचा शेअर बाजारात आयपीओ येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच कंपनीने बुधवारी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 8235 कोटींचा निधी जमवला आहे. पेटीएमने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ब्लॅकरॉक, सीपीपी गुंतवणूक बोर्ड, बिर्ला एमएफ आणि अन्य गुंतवणूकदारांकडून निधी जमवला आहे.
ब्लॅकरॉकने 1045 कोटी रुपये, कॅनडा पेन्शन योजना गुंतवणूक बोर्डाने 938 कोटी रुपये आणि जीआयसीने 533 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पेटीएमचा आयपीओ 8 नोव्हेंबर रोजी खुला होणार असून 10 नोव्हेंबरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. कंपनीने जुलै महिन्यात 16 हजार 600 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी अर्ज केला होता. त्यानंतर पेटीएमने 18 हजार 300 कोटी रुपये जमवण्यासाठी पुन्हा अर्ज दाखल केला. पेटीएमने आयपीओमध्ये आपल्या एका शेअरची किंमत 2080-2150 रुपये निश्चित केली आहे.
कोल इंडियानंतरचा सर्वात मोठा आयपीओ
कोल इंडियाचा वर्ष 2010 मध्ये आयपीओ आला होता. त्यानंतर आता पेटीएमचा 18 हजार 300 कोटी रुपयांचा आयपीओ सर्वात मोठा असणार आहे. सरकारी मालकीच्या कोल इंडियाने आयपीओच्या माध्यमातून 15 हजार 200 कोटी रुपये जमवले होते.
सफायर फूड्स इंडियाचा आयपीओ
पेटीएमशिवाय सफायर फूड्स इंडिया कंपनीचा आयपीओ 9 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. या आयपीओद्वारे 1,75,69,941 इक्विटी शेअरची विक्री होणार आहे. सफायर फूड्स इंडियाला आयपीओद्वारे 1500-2000 कोटींचा निधी उभारण्याचा विश्वास आहे.
10 नोव्हेंबर रोजी हा आयपीओ खुला होणार
लॅटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सच्या आयपीओसाठी 10-12 नोव्हेंबर दरम्यान अर्ज करता येणार आहे. 600 कोटींच्या या आयपीओद्वारे 474 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी होणार आहेत. तर, उर्वरित 126 कोटी रुपयांचे शेअर कंपनीचे प्रमोटर आणि सध्याच्या शेअरधारकांना (ओएफएस)नुसार विक्री होणार आहे. एक रुपयांच्या दर्शनीमुल्याच्या एका शेअरसाठी कंपनीने 190-197 रुपये निश्चित केली आहे.