मुंबई : देशातील सर्वात मोठा असलेला पेटीएम (Paytm) आयपीओ (IPO) नुकताच बाजारात दाखलं झाला आहे. या आयपीओने मार्केटमध्ये धुमाकुळ घातलाच आहे पण त्याने पेटीएमच्या 350 कर्मचाऱ्यांना एका क्षणात कोट्यधीश केलं आहे. पेटीएमच्या 18,300 कोटी रुपयांच्या आयपीओला बुधवारी इश्यूच्या शेवटच्या दिवशी 1.89 पटीने सबस्किप्शन मिळालं आहे. पेटीएमच्या आयपीओने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी शेअर विक्री केली आहे. याच सोबत पेटीएमचा आता देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत समावेश झाला आहे. पेटीएमने 2.5 अब्ज डॉलर्सचा आयपीओ बाजारात आणला आहे.


इलेक्ट्ऱॉनिक्स इंजिनिअर असलेल्या सिद्धार्थ पांडे हा पेटीएमचा कर्मचारी आयपीओ बाजारात दाखल झाल्यानंतर कोट्यधीश बनला आहे. डिजिटल पेमेंट अॅन्ड फायनान्शिअल कंपनीमध्ये नऊ वर्षांपूर्वी सामिल होत असताना आपल्या वडिलांनी विरोध केला असल्याचं सिद्धार्थ पांडे यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्थ पांडे आता पेटीएम या कंपनीत कामाला नसून एका स्टार्ट अप सोबत काम करतात. पण पेटीएममध्ये काम करत असताना त्यांनी शेअर्स खरेदी केले होते त्याचा आता त्यांना मोठा फायदा झाला आहे. 


रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात पेटीएमचे बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर कंपनीचे आजी आणि माजी असे 350 कर्मचारी कोट्यधीश होणार आहेत. आपल्या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न हे जवळपास दीड लाख रुपये इतकं असताना पेटीएम आयपीओमुळे मिळालेली ही रक्कम मोठं बक्षीस असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


पेटीएम नवीन व्यापारी आणि ग्राहक जोडण्यासाठी नवीन इश्यूमधून जमा केलेला निधी वापरण्याची योजना आखत आहे. मूल्यमापनावर गुंतवणूकदारांच्या मत भिन्नतेमुळे पेटीएमने IPO पूर्व निधी उभारला नाही. पेटीएमच्या मुद्द्याबाबत, आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, दररोज नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे पेमेंट मार्केटमधील स्पर्धा लक्षणीय वाढली आहे. जर पेटीएम व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली नाही, तर त्याचा त्याच्या व्यवसायावर वाईट परिणाम होईल. कंपनीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत पेमेंट सेवा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यातील जोखीम आणि फायदे समजून घेऊन गुंतवणूक करावी.


संबंधित बातम्या :