मुंबई : सेबीनं पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना नोटीस दिली आहे. विजय शेखर शर्मा यांच्यासह पेटीएमचा आयपीओ आला तेव्हा संचालक मंडळात असलेल्या लोकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार ही नोटीस चुकीची माहिती दिल्याच्या कारणावरुन दिल्याची माहिती आहे. पेटीएमचा आयपीओ नोव्हेंबर 2021 मध्ये आला होता. आज पेटीएमचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला.
पेटीएमला जारी केलेल्या नोटीसमध्ये प्रमोटर क्लासिफिकेशन नियमांचं पालन न केल्या प्रकरणी सेबीनं नोटीस दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सेबीनं चौकशी सुरु केली होती. पेटीएम पेमेंटस बँकेच्या चौकशीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कठोर कारवाई केली होती.
रिपोर्टनुसार सेबीनं जारी केलेल्या नोटीसचा प्रमुख मुद्दा विजय शेखर शर्मा यांना प्रमोटर्स म्हणून घोषित करायला हवं होतं हा आहे. जेव्हा पेटीएमचा आयपीओ आला होता त्यावेळी त्यांच्याकडे कर्मचारी या भूमिकेशिवाय व्यवस्थापनाचं नियंत्रण देखील होतं. पेटीएमचा आयपीओ आला तेव्हा कंपनीच्या संचालक मंडळात जे होते त्यांना देखील सेबीनं नोटीस दिली आहे. विजय शेखर शर्मा यांच्या त्या कृतीचं संचालक मंडळानं समर्थन का केलं होतं, असा सवाल सेबीनं केला आहे. सेबीच्या नियमानुसार विजय शेखर शर्मा यांना प्रमोटर्स म्हणून घोषित केलं असतं तर त्यांना एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्स साठी पात्र राहता आलं नसतं.
सेबीच्या नियमानुसार एखादी प्रोफेशनली मॅनेज्ड घोषित केली जात नाही तोपर्यंत प्रमोटर्स द्वारे संचलित मानलं जातं. व्यावसायिक दृष्टया कंपनीचं संचलन करण्यासाठी कंपनी च्या कोणत्याही भागिदाराकडे 10 टक्क्यांपेक्षा अधिक भागिदारी असू नये.
पेटीएमचे शेअर्स घसरले
बॉम्बे स्टॉक एक्सेंजवर पेटीएमचे शेअर्स शुक्रवारी 560 रुपयांवर होते. आज सकाळी ते शेअर्स 564.45 रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर ते 505 रुपयांपर्यंत खाली आले होते. बाजार बंद होईपर्यंत पेटीएमचा शेअर 530 रुपयांवर पोहोचला होता. सेबीच्या नोटीसनंतर शेअर्स धारकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पेटीएमच्या शेअर्सची विक्री केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पेटीएमनं त्यांचा तिकीट विक्रीचा व्यवसाय झोमॅटोला विकला होता.
इतर बातम्या :
Gold News: कोणत्या देशातील महिलांकडे सर्वाधिक सोनं? भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या