Narayana Murthy on India Business Culture : इन्फोसिसचे संस्थापक (Infosys Founder) एन.आर. नारायण मूर्ती (N.R. Narayana Murthy) यांनी भारतीय व्यावसायिक पद्वतीवर (India Business Culture) चिंता व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलं आहे की, 'भारताला समृद्ध होण्यासाठी प्रामाणिक संस्कृतीची गरज ज्यामध्ये पक्षपाताला जागा नसावी.' त्यांनी सांगितलं की, , ''भारताला समृद्ध होण्यासाठी जलद निर्णय घेण्याची, जलद अंमलबजावणी, त्रासमुक्त सोपे व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे.''
भारतातील सध्याच्या व्यावसायिक वातावरणावर भाष्य
परराष्ट्र मंत्रालयाने पुणे येथे आयोजित आशिया इकॉनॉमिक डायलॉग या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यामध्ये मूर्ती यांनी हजेरी लावली. त्यांनी म्हटलं की, देशातील केवळ एक छोटासा वर्ग कठोर परिश्रम करतो. पंतप्रधानांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली संस्कृती अद्यापही बहुतेक लोकांनी आत्मसात केलेली नाही. मूर्ती यांनी भारतातील सध्याच्या व्यावसायिक वातावरणावर भाष्य केलं आहे.
''कोणताही पक्षपात न करता झटपट निर्णय''
मूर्ती यांनी म्हटलं की, ''भारताला एक देश म्हणून समृद्ध होण्यासाठी प्रामाणिकपणाची संस्कृती आवश्यक आहे.'' त्यांनी पुढे सांगितलं की, ''भारतात अशी संस्कृती असली पाहिजे जिथे कोणताही पक्षपात न करता झटपट निर्णय घेतले जातील. तसेच व्यवहार प्रामाणिकपणे आणि सहजतेने पूर्ण करता येतील.''
चीनचं केलं कौतुक
आपल्याला जलद निर्णय घेण्याची, जलद अंमलबजावणी, त्रासमुक्त व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे, असं नारायण मूर्ती यांनी म्हटलं. त्यांनी सांगितलं की, 1940 च्या शेवटी भारत आणि चीन या दोन्ही देशांचा व्यावसायिक आकार समान होता, पण आता चीनचं व्यावसायिक आकारमान भारताच्या आकारमानाच्या सहा पटीने वाढलं आहे, कारण त्यांनी ही संस्कृती आत्मसात केली आहे.
मूर्ती यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा
मूर्ती यांनी म्हटलं की, भारतीय उद्योगपतींनी भारतातच राहून उद्योग करायचे शक्य झाल्यास फार आनंद होईल. भारतात चांगल्या कंपन्यांची कमतरता आहे. यूनीकॉर्न्स कंपन्या म्हणजेच एक अब्ज डॉलरची उलाढाल असणाऱ्या कंपन्याची कमी आहे. यामुळे खूप नुकसान होतं. मूर्ती यांनी सांगितलं की, 'आम्हा भारतीय उद्योगपतींनी फक्त भारतातच राहायचे असेल आणि भारतातच सर्व काही करायचे असेल तर तसं करण्यात आम्हाला खूप आनंद होईल. यासाठी सरकारने निर्णय त्वरित घेतले जावे आणि त्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
World Bank Head : भारतीय वंशाचे अजय बंगा होणार वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष, बायडन यांनी दिला प्रस्ताव