मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातील समभागांची विक्री करुन पैसे काढून घेण्याचं सत्र एकीकडे सुरु असल्याचं पाहायला मिळतं. मात्र डिसेंबर महिन्यात इक्विटी म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक वाढली आहे. रिटेल गुंतवणूकदारांच्या भक्कम पाठिंब्यामुळं एसआयपीद्वारे पहिल्यांदा करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीची रक्कम पहिल्यांदा 26 हजार कोटींच्या पार गेली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्यूअल फंड्स इन इंडियानं गुरुवारी यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. 


डिसेंबर महिन्यात म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक 14.5 टक्क्यांनी वाढून 41156 कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामध्ये इक्विटी म्युच्यूअल फंडमध्ये सर्वाधिक गुंतवणूक स्मॉल कॅप मध्ये आला आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडमध्ये जोखीम अधिक असून देखील म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक कायम ठेवलीय. 


डिसेंबर महिन्यात म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीद्वारे 26459.49 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. नोव्हेंबर 2024 मध्ये ही रक्कम 25319.66 कोटी रुपये होती. डिसेंबर 2024 मध्ये एसआयपी खात्यांची संख्या देखील सर्वोच्च होती. ती संख्या 10,32,02,796 पर्यंत पोहोचली आहे. नोव्हेंबर महिन्यात ही  संख्या 10,22,66,590 इतकी होती. डिसेंबर महिन्यात म्युच्यूअल फंड फोलिओची संख्या 22.5 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 


म्युच्यूअल फंडमधील असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम मात्र कमी झाली आहे. 68.08 लाख कोटींवरुन 66.93 कोटी रुपयांवर आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्यूअल फंड्स इन इंडियाचे सीईओ वेंकट चालसानी यांच्या मतानुसार शेअर बाजारात होत असलेल्या घडामोडी आणि  बाँड स्कीम्समधून काढण्यात  आलेल्या 1.27 लाख कोटी रुपयांमुळं हा परिणाम दिसत आहे. मात्र, महत्त्वाचा मुद्दा शेङ बाजारात अस्थिर बाजार स्थिती असून देखील इक्विटीशी निगडित योजनांमध्ये गुंतवणूक वाढली आहे. 


मोतिलाल ओसवाल एमसीचे मुख्य सीबीओ अखिल चतुर्वेदी यांच्या मतानुसार इक्विटी फंड विशेषत: स्मॉल कॅप आणि सेक्टोरेल थीमॅटिक फंडला मोठी मागणी होती. तर, कोटक महिंद्र एएमसीचे नॅशनल हेड मनीष महेता यांनी गुंतवणूकदार त्यांच्या जोखमीच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूकदारांमधील परिपक्वता दिसून येते. त्यामुळं सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड्स  कॅटेगरीत गुंतवणूक दुप्पट झाल्याचं ते म्हणाले.


इतर बातम्या : 


Gold Rate : सोन्याच्या दरात 215 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या विविध शहरातील दर एका क्लिकवर


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)