मुंबई : सध्याच्या काळात म्यूच्यूअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्यूच्यूअल फंडमध्ये आपल्या सोईनुसार गुंतवणूक करता येते. एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही जमा केलेल्या पैशांतून चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. त्यामुळे गुंतवलेल्या पैशांचे मुल्य वाढते. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार एसआयपी (SIP) केल्यास तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर साधारण 12 टक्के रिटर्न्स मिळतात. या रिटर्न्सचे प्रमाण हे कधीकधी 15 टक्क्यांपर्यंत जाते. सध्या कोणतीही शसकीय गुंतवणूक योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात रिटर्न्स देत नाही. मात्र एसआयपी करताना काही काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. एसआयपीच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करताना खालील चार गोष्टींची काळजी घेतल्यास, तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट, चारपटही होऊ शकतात.  


दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा 


एसआयपीच्या माध्यमातून तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ही गुंतवणूक 15, 20, 25 वर्षे किंवा यापेक्षा अधिक काळासाठी केल्यास तुम्ही जमा केलेल्या रकमेचे मूल्य अधिक वाढेल. महिन्याला कमी रक्कम गुंतवूनदेखील तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला ही गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी करावी लागेल. 


गुंतवणुकीसाठी शिस्त पाळा


तुम्हाला गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर शिस्त पाळणए गरजेचे आहे. तुम्ही एकदा गुंतवणूक चालू केल्यास, काहीही झाले तरी ती मध्येच थांबवू नये. दीर्घ मुदतीच्या एसआयपीवरही महिन्याला गुंतवणूक चालूच ठेवावी. काही लोक आपत्कालीन स्थितीत मध्येच पैसे काढतात. पण तसे करणे योग्य नाही. तुम्ही कमी रकमेसह पैशांची गुंतवणूक केली तरी हरकत नाही, पण ती प्रत्येक महिन्याला, शिस्तबद्ध पद्धतीने, खंड न पडू देता करणे गरजेचे आहे. 


मोठ्या रकमेची एसआयपी चालू करू नका 


तुम्ही दीर्घ मुदतीसाठी एसआयपी करत असाल तर महिन्याला मोठी रक्कम गुंतवू नका.  एसआयपीसाठी तुम्ही मोठी रक्कम गुंतवत असाल तर कठीण काळात ही रक्कम भरणे कठीण होऊन बसते आणि एसआयपी बंद होते. परिणामी एसआयपीतून मिळणारा परतावा हा मिळत नाही. तुम्ही कितीही एसआयपी चालू करू शकता. एसआयपीच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे जास्त पैशांनी एसआयपी चालू करू शकतो, असे तुम्हाला वाटत असेल तर त्या वेळी नवी एसआयपी चालू करावी.  


टॉप अप एसआयपी करा 


एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही एक मोठा फंड तयार करू सकते. मात्र एसआयपी करताना तुम्हाला आणखी परतावा हवा असेल तर टॉप अप एसआयपीचा पर्याय निवडायला हवा. म्हणजेच तुम्ही करत असलेल्या एसआयपीमध्ये प्रत्येक वर्षाला थोडी-थोडी वाढ करायला हवी.  तुम्ही तुमच्या एसआयपीवर प्रत्येक वर्षाला 10 किंवा 5 टक्क्यांनी वाढ करत असाल तर तुम्हाला भविष्यात जबरदस्त फायदा होऊ शकतो. तुम्ही गुंतवलेला पैसा लवकरच दुप्पट, चौपट होऊ शकतो. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान, 'हा' नवा नियम जाणून घ्या; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!


सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी? अन्यथा होऊ शकते फसवणूक


भारतीय केशरला सोन्याचा दर, 1 किलोसाठी तब्बल 4.95 लाख रुपये, दर वाढण्याचं कारण काय?