मुंबई : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेची घोषणा राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं जुलै 2024 पासून ही योजना सुरु केलेली आहे. या योजनेत अर्ज सादर करण्यासाठी सरकारनं मुदत वाढवलेली आहे. याशिवाय अर्ज मंजूर करण्याचे अधिकार देखील आता अंगणवाडी सेविकांना असणार आहे. राज्य सरकारनं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे किती महिलांना पैसे दिले याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील किती महिलांना पैसे मिळाले?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3 हजार रुपये पुण्यातील कार्यक्रमाद्वारे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज दाखल केले होते त्यांना 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम पाठवण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारनं त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज सादर केले त्यांना 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथील कार्यक्रमाद्वारे दोन महिन्यांची रक्कम देण्यात आली आहे.
आता राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.
राज्य सरकारकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र सरकारनं पहिल्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर राज्य राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.
अर्जांना मंजुरी अंगणवाडी सेविका देणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा अर्जांना मान्यता देण्याचे अधिकार विविध घटकांना देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज सादर केल्याचं नुकतंच उघड झाल होतं. त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आता राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांना दिले आहेत.
इतर बातम्या :