Pakistan Business News : आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान (Pakistan) देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात (Financial crisis) आहे.  पाकिस्तानची काय स्थिती आहे हे साऱ्या जगाला माहित आहे. मात्र, पाकिस्तानचे नशीब बदलू शकते.  कारण समुद्रात पाकिस्तानला आशेचा किरण दिसला आहे.  पाकिस्तानला समुद्रात मोठा साठा सापडला आहे. हा साठा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा (Petroleum and natural gas reserves) आहे.


 महागड्या तेलाचा प्रश्नही सुटणार


पाकस्तानला समुद्रात सापडलेला हा 'निळा खजिना' इतका मोठा आहे की त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारू शकते. याशिवाय अनेक देशांतील महागड्या तेलाचा प्रश्नही सुटू शकतो. पाकिस्तानात सापडलेला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा साठा हा जगातील चौथा सर्वात मोठा साठा असल्याचं बोललं जात आहे. डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, गरीब पाकिस्तानचा हा शोध तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे. मित्र देशासोबत भागीदारी करून पाकिस्तानने हा प्रचंड साठा शोधला आहे. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिक सर्वेक्षणातून या ठिकाणाची ओळख पटली असून संबंधित विभागाने पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात केलेल्या या शोधांची माहितीही सरकारला दिली आहे.


तेल काढण्यासाठी लागणार अनेक वर्षे 


'ब्लू वॉटर इकॉनॉमी'चा फायदा घेण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल ठरवलं जाणार आहे.  बिडिंग आणि एक्सप्लोरेशनच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे. यावरुन त्याचा आकार निश्चित करण्याचे आणि शोधण्याचे काम लवकरच सुरू होऊ शकते. ड्रिलिंग आणि तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.


तेल आणि वायूसह इतर मौल्यवान खनिजे सापडण्याची शक्यता


पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू व्यतिरिक्त, समुद्रात इतर मौल्यवान खनिजे आणि घटक सापडण्याची शक्यता आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळं पाकिस्तानला आर्थिक पाठबळ मिळण्यात मदत होणार आहे.


जगातील चौथ्या क्रमांकाचे तेल आणि वायूचे साठे?


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात सापडलेले तेल आणि वायूचे साठे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे साठे आहेत. व्हेनेझुएलामध्ये सध्या सर्वात जास्त तेलाचे साठे आहेत, अंदाजे 3.4 अब्ज बॅरल. युनायटेड स्टेट्स अप्रयुक्त शेल तेल साठ्यात आघाडीवर असताना. पहिल्या पाचमध्ये सौदी अरेबिया, इराण, कॅनडा आणि इराक यांचा समावेश आहे. हे साठे देशाच्या ऊर्जेची मागणी पूर्ण करू शकतील की नाही हे त्यांच्या आकारमानावर आणि पुरवठ्यावर अवलंबून आहे.