Fisherman : कधी कोणाच्या आयुष्यात काही बदल होईल हे सांगता येत नाही. कारण अशीच एक घटना घडली आहे. रातोरात एका मच्छीमाराचं (Fisherman) आयुष्य बदलून गेलं आहे. एका रातीत हा मच्छिमार करोडपती बनला आहे.  ही कहानी पाकिस्तानच्या (Pakistan) मच्छिमाराची आहे. अलीकडेच एके दिवशी त्या मच्छिमाराने असा एक मासा पकडला, ज्यामुळं तो रातोरात करोडपती झाला आहे. 


या माशाने बदलवलं नशिब 


स्वप्नात किंवा बॉलिवूड चित्रपटांमध्ये असे घडते की लोक रातोरात करोडपती होतात. प्रत्यक्षात असे क्वचितच घडते, परंतु पाकिस्तानच्या या मच्छिमारासाठी हे खरे ठरले आहे. वर्षानुवर्षे रोज मासेमारी करणाऱ्या मच्छिमाराचे असे अचानक काय झाले, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. ही सिनेमॅटिक दिसणारी कथा पाकिस्तानातील कराची येथे राहणाऱ्या हाजी बलुचसोबत घडली आहे. तो व्यवसायाने मच्छीमार आहे. हाजी बलोच हा कराचीतील इब्राहिम हैदरी या अत्यंत सामान्य गावातील रहिवासी आहे. अलीकडेच, एके दिवशी मासेमारी करताना त्याने एक मासा पकडला ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. गरिबीत जगणारा हाजी बलुच अचानक करोडपती झाला आहे.


मौल्यवान मासा पकडला


पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हाजी बलुच आणि त्यांच्या टीमने धोक्यात असलेला आणि मौल्यवान मासा पकडला. हा मासा सोवा या नावाने ओळखला जातो. अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हा मासा हाजी बलोच आणि त्यांच्या टीमसाठी सोन्याचा खजिना ठरला आहे. पाकिस्तानच्या मच्छिमार लोक मंचाचे प्रतिनिधी मुबारक खान यांचा हवाला देत पीटीआयने म्हटले आहे की, हाजी बलोच आणि त्यांच्या टीमला सापडलेल्या सोवा माशाचा लिलाव शुक्रवारी पहाटे कराची हार्बर येथे झाला. त्याला लिलावात 70 दशलक्ष पाकिस्तानी रुपये इतकी मोठी रक्कम मिळाली. भारतीय चलनात ही रक्कम 2.05 कोटी रुपये इतकी आहे.


सोवा माशाला एवढा दर का?


हाजी बलोच आणि त्यांच्या टीमला मिळून 10 सोवा मासे पकडण्यात यश मिळालं आहे. त्यांना प्रत्येक माशाची किंमत सुमारे 7 दशलक्ष पाकिस्तानी रुपये मिळाली. सोवा मासे ही एक मोठी प्रजाती आहे. हा मासा आकाराने दीड मीटरपर्यंत वाढतो आणि त्याचे वजन 20 ते 40 किलोपर्यंत असते. औषधांमध्ये त्याचा वापर होतो. प्रजाती दुर्मिळ असल्यामुळं या माशाला एवढी जास्त किंमत मिळत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


पापलेट राज्यमासा म्हणून घोषित; 54 माशांचे आकारमान निश्चित, खरेदी- विक्रीवर राज्य सरकारचे निर्बंध