Diwali Vastu Tips: दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. यावेळी 12 नोव्हेंबरला दिवाळी (Diwali 2023) साजरी होणार आहे. दिवाळीपूर्वी लोक घरांची साफसफाई करतात, कारण जे घर स्वच्छ असतं त्या घरातच लक्ष्मीचा प्रवेश होतो असं म्हणतात. ज्या घरात पसारा असतो, अस्वच्छता असते, त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही, अशा घरात गरिबी वास करते. दिवाळीत घराची साफसफाई करताना काही गोष्टी लक्षात ठेवून कराव्या. काही गोष्टी करणं टाळावं, याबद्दल अधिक जाणून घेऊया.
तुटलेल्या वस्तू
दिवाळीची साफसफाई करताना घरात एखादी तुटलेली वस्तू दिसली तर ती चुकूनही घरात ठेवू नका. तुटलेल्या वस्तू ताबडतोब फेकून द्याव्यात, याशिवाय घरातील रद्दीही फेकून द्यावी. अशा वस्तू घरात राहिल्याने आर्थिक नुकसान होतं आणि आर्थिक संकट वाढतं.
घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावा
दिवाळीच्या खरेदीत दारावर लावण्यासाठी नवीन तोरणं देखील आणली जातात, मात्र तोरण खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. तोरणामध्ये कोरडी पानं, कोरड्या फुलांचा वापर केला जाऊ नये, याची विशेष काळजी घ्या. घराच्या मुख्य दारावर नेहमी ताज्या फुलांचा हार किंवा स्वच्छ तोरण लावावं, यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
घर रंगवण्यापूर्वी हे लक्षात घ्या
दिवाळीपूर्वी बहुतेक जण आपली घरं रंगवतात. घराला रंग देताना रंगरगोटीसाठीचा रंग काळजीपूर्वक निवडा. मुख्य दाराजवळील खोलीला पांढरा, हिरवा किंवा गुलाबी रंग देणं शुभ मानलं जातं. हॉलला पिवळा किंवा हिरवा रंग देणं शुभ असतं. स्वयंपाकघरात निळा, गुलाबी किंवा हिरवा रंग चांगला मानला जातो. यासोबत बेडरूममध्ये पिवळा आणि हिरवा रंग शुभ मानला जातो.
लाईटिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा
दिवाळीला प्रत्येक घरात रोषणाई केली जाते, मात्र लाईटिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दिवाळीच्या दिवशी लाईटिंग योग्य दिशेला लावावी. घराच्या पूर्व दिशेला पिवळ्या, केशरी आणि लाल रंगाच्या लाईटिंग लावणं शुभ असतं. तर पश्चिमेला गुलाबी आणि पिवळी लाईटिंग लावणं शुभ मानलं जातं. उत्तरेला पिवळी, निळी आणि हिरवी लाईटिंग चांगली मानली जाते. तर दक्षिणेला पांढरी, पिवळी, लाल, जांभळी लाईटिंग लावणं शुभ आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)