कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि राजकीय कुचेष्ठेचा आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रतिष्ठेचा विषय होऊन गेलेल्या थेट पाईपलाईनचं पाणी (Kolhapur Direct Pipeline) अखेर कोल्हापूर भूमीत पोहोचलं आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस कोल्हापूरकरांसाठी दिवस दिवाळीपेक्षा अधिक आनंद देणारा होता. तब्बल 53 किमी थेट पाईपलाईन टाकून काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनमधून आलेले पाणी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात रात्री 10  वाजून 50 मिनिटांनी पोहोचले. त्यामुळे 1987 पासून सुरु असलेली मागणी आज पूर्णत्वास गेली आहे. पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचताच एकच जल्लोष करण्यात आला.  



आमदार सतेज पाटील भावूक


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. मात्र, तत्पूर्वी टप्प्याटप्प्याने पंपांची चाचणी घेत चार पंप सुरू केले जाणार आहेत. त्यापैकी आज एका पंपातून पाणी उपसा सुरू करण्यात आला. त्यातील पाणी शहराच्या काही भागात सोडण्यात येणार आहे. कोल्हापूरकरांना दाखवलेलं स्वप्न सत्यात उतरल्यानंतर आमदार सतेज पाटील (Satej Patil) भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील आणि काँग्रेस माजी नगरसेवकांनी पाणी पूजन केले. उपस्थितांनी हलगी-घुमक्याच्या तालावर गुलालांची उधळण करत एकच जल्लोष केला. यावेळी माजी महापौर अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, संजय मोहिते, अर्जुन माने, भूपाल शेटे, दीपा मगदूम, विजय सूर्यवंशी, सुभाष बुचडे, डॉ. संदीप नेजदार आदी उपस्थित होते.



मागणी दशकांची असली तरी नऊ वर्षांपूर्वीच म्हणजेच 2014 पासून या प्रश्‍नाला खऱ्या अर्थाने गती मिळाली होती. निवडणूक प्रचारात आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांसाठी काळम्मावाडीतून थेट पाईपलाईनच्या माध्यमातून शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवणारच, अशी प्रतीज्ञा केली होती.शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेतूनच पाणी दिले पाहिजे, या मागणीसाठी कोल्हापूरने प्रदीर्घ लढा देण्यात आला. अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. 27 ऑगस्ट 2014 मध्ये कामाचे भूमिपूजन झाले होते. 



इतर महत्वाच्या बातम्या