मुंबई :महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 घरांसाठी नोंदणी करण्यासाठी लॉटरी जाहीर केली होती. या घरांसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी 9 ऑगस्ट पासून सुरुवात झाली होती. म्हाडानं पहिल्यांदा 4 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत दिली होती. अर्ज नोंदणी करण्यासाठी 26 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. म्हाडानं त्यानंतर 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी केवळ 10 दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळं म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करणाऱ्यांनी मुदत संपेपर्यंत वाट पाहण्याऐवजी लवकर अर्ज दाखल करावेत.
म्हाडाची घरं कोणत्या भागात?
म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यासह मुंबईतील विविध भागातील घरांसाठी लॉटरी काढण्यात आलेली आहे.
म्हाडाकडून घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय
म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यापैकी विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे. म्हाडानं 12 लाखांपासून 75 लाखांपर्यंत घरांच्या किमती कमी केल्या आहेत.
म्हाडानं नव्यानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अर्जांची नोंदणी 19 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येतील. घरांसाठीची अनामत रक्कम देखील 19 सप्टेंबरपर्यंत भरावी लागेल. त्यानंतर म्हाडाकडून या घरांची सोडत 8 ऑक्टोबरला काढली जाईल. लॉटरीमध्ये कुणाला घर लागलं आणि कुणाला मिळालं नाही याबाबतची माहिती त्याच दिवशी कळेल. ज्या अर्जदारांना घरं लागली नाहीत त्यांनी भरलेली अनामत रक्कम त्यांच्या खात्यांवर जमा करण्यास 9 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गटातून पात्र नागरिकांना अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं अधिवास प्रमाणपत्र अर्ज दाखल करताना सादर करणं आवश्यक आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातून अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असणं आवश्यक आहे. तर, अल्प उत्पन्न गटातून अर्ज सादर करणाऱ्यांचं उत्पन्न 9 लाखांपर्यंत तर मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तीचं उत्पन्न 12 लाखांपर्यंत असणं आवश्यक आहे. उच्च उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची कमाल मर्यादा नाही.
इतर बातम्या :