मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची (Mukhyamantri yuva karya prashikshan yojana 2024)घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली होती. या योजनेद्वारे युवकांना स्टायपेंड म्हणून राज्य सरकारच्यावतीनं 6 ते 10 हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. कौशल्य, रोजगार, उ‌द्योजकता व  नाविन्यता विभागातर्फे ही योजना राबवली जाणार आहे. मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत पंढरपूरमध्ये माहिती दिली होती. या योजनेची माहिती देताना एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडका भावांसाठी देखील योजना (Ladka Bhau Yojana) आणल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांचा सरकारनं नवी योजना जाहीर केल्याचा समज झाला. लाडका भाऊ योजना अशी योजना सरकारनं आणलेली नसून ती  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. 


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकी काय?


राज्यातील युवकांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उ‌द्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणा‌द्वारे रोजगारक्षम करणे, हा सरकारचा प्रमुख हेतू आहे. राज्य सरकारकडून "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता रु.5500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः


उद्योजकांना त्यांच्या उ‌द्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणा‌द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी कौशल्य विकास, रोजगार व उ‌द्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राबवण्यात येणार आहे.



बारावी पास झाल्यानंतर लगचेच 6 हजार रुपये मिळणार का?


राज्य सरकारनं जाहीर केलेल्या योजनेचे 6 हजार रुपये बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना सरसकट दिले जाणार नाहीत. शासन निर्णयातील अटीनुसार ज्यांचं शिक्षण चालू नाही तेच यासाठी अर्ज  करु शकतात. 


बारावीनंतर आणि पदवीनंतर दुसऱ्यांदा या योजनेचा लभ मिळेल का?


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनुसार बारावी पास असलेल्या युवकानं अर्ज केल्यास 6 हजार रुपये दिले जातील. एखाद्या युवकानं पुढे जाऊन पदवी पूर्ण केल्यास त्याला पुन्हा या योजनेचा लाभ घेता येईल का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. योजनेचा लाभ दुसऱ्यांदा मिळणार नाही. एका युवकाला या योजनेचा लाभ एकदाच मिळणार आहे.  


योजनेसाठी अर्ज कुठं करायचा?


बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील.विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उ‌द्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. यानंतर अर्ज दाखल केलेल्या उेदवारांना प्रशिक्षणाची संधी दिली जाईल. 


स्टायपेंडची रक्कम कशी मिळणार?


सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत वि‌द्यावेतन देण्यात येईल. विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.



मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेच्या अटी


उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. बारावी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असणाऱ्या युवकाला योजनेसाठी  अर्ज करता येईल. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.आधार नोंदणी केलेली असावी आणि उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उ‌द्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.


संबंधित बातम्या : 


Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावानं पैसे मागणाऱ्यांनो सावधान; नाहीतर तुरुंगात जाल!


लाडकी बहीण, लाडके भाऊ झाले असतील तर लाडक्या नातवांचं तेवढं बघा, मनसेच्या गजानन काळेंची सरकारवर खोचक टीका!