LIC Share Dividend :  देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओचा मोठा बोलबाला झाला होता. मात्र, लिस्टिंग होताना एलआयसीची कामगिरी निराशाजनक होती. डिस्काउंट दरात कंपनी लिस्ट झाली. त्यानंतरदेखील शेअरच्या दरात घसरण कायम सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली आहे. गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी एलआयसी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 


LIC कंपनी या महिन्यात आपला पहिला तिमाही निकाल (LIC Result) जाहीर करणार आहे. पुढील आठवड्यात तिमाही निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना लाभांश (LIC Dividend) देखील जाहीर केला जाणार आहे. 


पहिल्या तिमाहीचा निकाल 


एलआयसीने 'बीएसई'ला दिलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी पहिला तिमाही निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 30 मे रोजी मार्च तिमाहीच्या निकालांवर विचारविनिमय करणार असून त्याला मंजूरी देणार आहे. त्याशिवाय गुंतवणुकदारांना लाभांश द्यायचा असेल तर त्याबाबतही या बैठकीत घोषणा केली जाणार आहे. 


इश्यू प्राइजपेक्षाही कमी शेअर दर 


आज, मंगळवारी एलआयसीच्या शेअर दरात वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. बाजारातील व्यवहार आज थांबले तेव्हा एलआयसीचा शेअर दर 824.80 रुपयांवर बंद झाला. आज दिवसभरात 834 इतकी उच्चांकी दर गाठला होता. सोमवारी एलआयसीचा शेअर वधारला होता. मात्र, बाजार बंद होईपर्यंत त्यात नफा वसुली दिसून आली. त्यामुळे शेअर दरात आणखी घसरण झाली. 


एलआयसी शेअर बाजारात लिस्ट होताना 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जवळपास 9 टक्क्यांच्या डिस्काउंट दरात शेअर लिस्ट झाला. 
LIC चा IPOआकार 20,557 कोटींचा होता. एलआयसीचा आयपीओ 2.95 पटीने सबस्क्राइब झाला होता. सध्या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य (LIC MCap) 5 लाख 24 हजार 626.93 कोटी रुपये इतका झाला आहे.


मोठा लाभांश मिळणार?


शेअर दरात मोठी घसरण झाली असली तरी  एलआयसीच्या गुंतवणुकदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कंपनीने मागील वर्षीदेखील लाभांश दिला नव्हता. केंद्र सरकारला एलआयसीचे 25 टक्के शेअर विकायचे आहेत.  आयपीओच्या माध्यमातून सरकारने फक्त 3.5 टक्के शेअर्स विक्री केली आहे. सरकार येत्या काळात एफपीओ देखील आणू शकते. एफपीओला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आयपीओ मिळालेल्या गुंतवणुकदारांनाही फायदा मिळावा यासाठी एलआयसीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या गुंतवणुकदारांना मोठा लाभांश मिळण्याची शक्यता आहे.