Why Crude Oil Price Falling : मागील काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 140 डॉलर प्रति डॉलर इतके होते. त्यानंतर मागील तीन-चार महिन्यांपासून कच्च्या तेलाचे दर घसरू (Crude Oil Price Falling) लागले आहेत. साधारणपणे कच्च्या तेलाच्या दरात मागील तीन महिन्यात 30 डॉलरची घसरण दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरात होत असलेली घसरण ही आर्थिक मंदीची चाहूल आहे का, (Economic Recession) अशी चर्चा होऊ लागली आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही महागाई अद्यापही नियंत्रणात आली नाही. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. यापुढील पतधोरण आढावा बैठकीत व्याज दरात वाढ होण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. अमेरिकेसह इतर देशातील मध्यवर्ती बँकांनीदेखील व्याजदरात वाढ केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये काही देश व्याज दरवाढ करण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे म्हटले जाते. फेडरल रिझर्व्ह, बॅंक ऑफ इंग्लंड आणि स्विझ बॅंकेकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडूनदेखील रेपो व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
व्याज दरात वाढ झाल्याने बाजारातील चलन पुरवठा कमी होतो. त्याच्या परिणामी लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी होते. यामुळे मागणी पुरवठ्यात संतुलन राखले जाते. मात्र, दुसऱ्या बाजूला व्याज दरवाढीमुळे बाजारातील गुंतवणूकही कमी होते. नोकऱ्यांची संख्या कमी होण्याची भीती असते. बहुतेक देशांना व्यापार तुटीचा सामना करावा लागतो.
मंदीची चाहूल ?
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांकडून व्याज दरात वाढ होत असल्याने आणि कच्च्या तेलाची मागणी घटल्याने दर घसरले आहेत. कच्च्या तेलाची मागणी घटत असल्याने ही मंदीची चाहूल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कच्च्या तेलाची मागणी घटण्याच्या भीती बाजारात निर्माण झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 86 डॉलर प्रति बॅरलवर तर डब्ल्यूटीआय क्रूड 79 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. अमेरिकेच्या WTI क्रूड ऑइलच्या दरात जवळपास 5 टक्क्यांची घट झाली आहे. बाजारात मागणी घटण्याच्या भीतीने कमोडिटीच्या दरात घट होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तर, दुसऱ्या बाजूला डॉलरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डॉलरच्या निर्देशांकाने दोन दशकातील उच्चांक गाठला आहे.
जागतिक बँकेचा इशारा
पुढील वर्षी जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा जागतिक बँकेने आपल्या अहवालात दिला आहे. वर्ष 1970 मधील मंदीनंतर सावरल्यानंतर ही मोठी आर्थिक मंदी असेल असा इशारा जागतिक बँकेने आपल्या अहवालात दिला आहे.