What Is Form 16 : इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची वेळ तारीख जवळ आली आहे. नोकरदार करदात्यांना लवकरच त्यांच्या कंपनीकडून फॉर्म-16 (Form 16) मिळण्यास सुरुवात होईल. यंदा कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आज म्हणजेच 15 जूनपासून फॉर्म-16 देण्यास सुरु करतील. नोकरदार करदात्यांसाठी फॉर्म-16 हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामुळे त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरणं सोपं होतं. जाणून घेऊया फॉर्म-16 म्हणजे काय आणि तो इतका महत्त्वाचा का आहे?


कर्मचाऱ्यांना फॉर्म-16 देणं कंपन्यांना अनिवार्य


इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेत फॉर्म-16 महत्त्वाची भूमिका बजावतो. यामध्ये कर्मचार्‍याला दिलेला पगार, कर्मचार्‍याने दाखवलेला डिडक्शन (Deductions) अर्थात वजावट आणि कंपनीने कापलेला टीडीएस  (Tax Deducted At Source) म्हणजेच उत्पन्नावरील कर कपातीची माहिती असते. आयकर कायद्याच्या कलम 203 अंतर्गत, कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांना फॉर्म-16 देणं बंधनकारक करण्यात आलं आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर कापलेल्या टीडीएसचा संपूर्ण तपशील असतो.


डेडलाईनआधीच इन्कम टॅक्स रिटर्न भरा


कंपन्या आजपासून फॉर्म-16 द्यायला सुरु करतील, त्यामुळे तुम्ही जर नोकरदार असाल तर तुम्हालाही तो लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फॉर्म-16 मिळाल्यानंतर आयकर रिटर्न भरण्यात वेळ घालवू नका. यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत (ITR Filing Deadline) 31 जुलै आहे. तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरु शकता. डेडलाईन उलटून गेल्यानंतर दंड म्हणून काही रक्कम आकारली जाते. त्यामुळे डेडलाईनपर्यंतची वाट पाहणं योग्य नाही. डेडलाईनपर्यंत थांबल्यास पोर्टलवर ट्रॅफिक वाढल्याने साईट क्रॅश होण्याचे किंवा स्लो होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अडचणी निर्माण होऊ शकतात.


फॉर्म 16 मधील भत्त्याचा तपशील तपासून घ्या


दरम्यान इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी फॉर्म-16 संपूर्ण वाचण्याची तसंच तपासण्याची आवश्यकता आहे. तुमच्या फॉर्म-16 मध्ये भत्ता दाखवला आहे की नाही ते तपासून घ्या. यामध्ये घरभाडे भत्ता म्हणजेच HRA आणि रजा प्रवास सहाय्य म्हणजेच Leave Travel Allowance हे महत्त्वाचे आहेत. याशिवाय आयटीआर भरण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासणेही आवश्यक आहे.


या 5 गोष्टींकडे लक्ष द्या


1. तुमचा पॅन क्रमांक बरोबर आहे की नाही ते तपासा. जर तो चुकीचा असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंडसाठी दावा करता येणार नाही.
2. फॉर्म-16 मध्ये तुमचं नाव, पत्ता आणि कंपनीचा TAN क्रमांक तपासा.
3. फॉर्म-16 मधील कर कपात फॉर्म-26 AS आणि AIS सोबत जुळत असल्याची खात्री करा.
4. जर तुम्ही जुन्या कर प्रणालीची निवड केली असेल, तर कर बचत कपातीचे तपशील तपासून घ्या.
5. जर तुम्ही 2022-23 मध्ये नोकरी बदलली असतील तर जुन्या कंपनीकडून फॉर्म-16 अवश्य मिळवा.


हेही वाचा


ITR Filling : ITR फाईल करत असाल तर 'या' काही गोष्टी ठेवा लक्षात होणार नाही नुकसान