Upcoming IPO :  साई सिल्क,कलामंदिर आणि  Kfin Technologies या दोन कंपन्यांच्या आयपीओला सेबीने मंजूरी दिली आहे. साई सिल्क,कलामंदिर ही कंपनी पोशाख विक्री करणारी दक्षिण भारतीय कंपनी आहे. साई सिल्क कंपनीला आयपीओद्वारे 1,200 कोटी रुपये उभे करायचे आहेत तर Kfin Technologies या कंपनीला आयपीओ अंतर्गत 2400 कोटी उभारण्याची योजना आहे.  साई सिल्क,कलामंदिर आणि  Kfin Technologies या दोन्ही कंपन्यांचा तपशील आणि या दोन्ही आयपीओशी संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.. या दोन्ही कंपन्यांचा मिळून एकूण 3600 कोटी रुपयांचा आयपीओ असेल.


साई सिल्क, कलामंदिर आयपीओ


ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार या आयपीओ अंतर्गत 600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, कंपनीच्या प्रवर्तक आणि प्रवर्तक समूह संस्थांद्वारे 18,048,440 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. कंपनीने जुलैमध्ये सेबीकडे आयपीओशी संबंधित कागदपत्रे दाखल केली होती. कंपनीला ८ नोव्हेंबरला निरीक्षण पत्र प्राप्त झाले आहे. आयपीओ आणण्यापूर्वी कोणत्याही कंपनीला निरीक्षण पत्र मिळणे आवश्यक आहे.


निधीचा वापर कुठे केला जाईल 


या इश्यूमधून उभी केलेली रक्कम 25 नवीन स्टोअर्स आणि दोन गोदामे उघडण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. यासोबतच हा निधी कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठीही वापरला जाईल. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स, एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत. इक्विटी शेअर्स BSE आणि NSE वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.


साई सिल्क या कंपनीबद्दल माहिती


साई सिल्क कलामंदिर, वारा महालक्ष्मी सिल्क, मंदिर आणि केएलएम फॅशन मॉल या चार स्टोअर फॉरमॅटद्वारे बाजारातील विविध विभागांमध्ये उत्पादने ऑफर करतात. यामध्ये प्रीमियम एथनिक फॅशन, मध्यम उत्पन्नासाठी एथनिक फॅशन आणि व्हॅल्यू फॅशनचा समावेश आहे. साई सिल्क हे दक्षिण भारतातील पारंपारिक पोशाखांचे, विशेषत: साड्यांचे प्रमुख किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आहे. कंपनी सध्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या चार प्रमुख दक्षिण भारतीय राज्यांमध्ये 50 स्टोअर्स चालवते.


KFin Technologies आयपीओ


KFin Technologies या आणखी एका कंपनीने आयपीओ लाँच करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळवली आहे. फायनान्शिअल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म केफिन टेक्नॉलॉजीजने ३१ मार्च रोजी सेबीकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली होती. कंपनीला ७ नोव्हेंबरला निरीक्षण पत्र मिळाले होते. 2400 कोटी रुपयांचा हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित आहे.


कंपनीबद्दल माहिती


KFin ही 31 जानेवारी 2022 रोजी सेवा दिलेल्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) क्लायंटच्या संख्येनुसार भारतीय म्युच्युअल फंडांसाठी देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदार समाधान प्रदाता आहे. कंपनी भारतातील 42 AMC पैकी 25 ला सेवा पुरवते, जे 60 टक्के बाजाराचे प्रतिनिधित्व करते. डिसेंबरअखेर संपलेल्या नऊ महिन्यांसाठी, कॅफिनचा ऑपरेशन्समधून महसूल 458 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 97.6 कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलात वार्षिक 35 टक्के आणि नफ्यात 313 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ICICI सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया, IIFL सिक्युरिटीज आणि जेफरीज इंडिया या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.