LIC IPO : एलआयसी आयपीओसाठी बोली लावण्याची मुदत संपण्यास आता अवघे काही तास राहिले. एलआयसीचा आयीपो हा देशातील सर्वात मोठा आयपीओ आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी शेअर बाजारमध्ये लिस्ट होत आहे. सरकारी मालकीची विमा कंपनी आपला 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. देशातील गुंतवणुकदारांकडून एलआयसीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत असताना परदेशी गुंतवणुकदारांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 


एलआयसीकडून आयपीओच्या माध्यमातून 21 हजार कोटींचा निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. आयपीओ दुप्पट सब्सक्राइब झाला आहे. पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी यांच्यासाठी राखीव असलेल्या कोट्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याशिवाय, किरकोळ गुंतवणुकदारांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला आहे. 


परदेशी गुंतवणुकदारांकडून थंड प्रतिसाद


मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. परदेशी गुंतवणुकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे बाजारात घसरण दिसून येत आहे. एलआयसी आयपीओसाठी परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी कोटा राखीव ठेवण्यात आला होता. या कोट्यात परदेशी गुंतवणुकदारांकडून फक्त आठ टक्के शेअरसाठी बोली लावण्यात आली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याज दरात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय, वाढत असणारी महागाई आदी विविध कारणांमुळे विक्रीचा जोर वाढला आहे. 


अखेरच्या दिवशीदेखील गुंतवणुकदारांकडून एलआयसी आयपीओसाठी प्रतिसाद सुरू आहे. आतापर्यंत आयपीओ 2.50 पटीने सब्सक्राइब झाला आहे. पॉलिसीधारकांसाठी असलेला राखीव कोटा 5.70 पटीने सब्सक्राइब झाला आहे. Qualified Institutional Buyers (QIB)चा कोटा 2.13 पटीने सब्सक्राइब झाला आहे. बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांचा कोटा 2.07 पटीने सब्सक्राइब झाला आहे. 


ग्रे मार्केटमध्ये किती दर?


शेअर बाजारात येऊ घातलेल्या आयपीओला ग्रे मार्केट कसा प्रतिसाद देतो, याकडे अनेकांचे लक्ष असते. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी शेअर प्रीमियम दर घसरला असल्याचे दिसून आले आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी एलआयसीच्या प्रीमियम शेअर दर हा 85 रुपयांवर होता. आज हा प्रीमियम दर 36  रुपयांवर आला आहे. रविवारी हा दर 60 रुपयांवर होता. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीसाठी 92 रुपयांपर्यंत प्रीमियम दर देण्यात आला होता. त्यात आता घसरण होऊन हा हा दर 36 रुपयांवर आला आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम एलआयसीच्या ग्रे मार्केट दरावर होत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले.