LIC IPO : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) आयपीओसाठी बोली लावण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एलआयसी आयपीओला पॉलिसीधारक, किरकोळ गुंतवणुकदारांनी बोली लावली आहे. आयपीओसाठी रविवारपर्यंत 1.79 पटीहून अधिक बोली लागली आहे. एलआयसीचा आयपीओ हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे. त्यामुळे आयपीओच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटची संधी आहे.
पॉलिसीधारकांचा मोठा प्रतिसाद
एलआयसी आयपीओसाठी पॉलिसीधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 5.4 पट अधिक सबस्क्रिप्शन झाले आहे. आज शेवटच्या दिवशी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 3.79 पटीने सबस्क्रिप्शन झाले आहे. तर, किरकोळ गुंतवणुकदारांनी 1.59 पटीने सबस्क्रिप्शन केले. आहे.
ग्रे मार्केटमध्ये किती दर?
शेअर बाजारात येऊ घातलेल्या आयपीओला ग्रे मार्केट कसा प्रतिसाद देतो, याकडे अनेकांचे लक्ष असते. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी शेअर प्रीमियम दर घसरला असल्याचे दिसून आले आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी एलआयसीच्या प्रीमियम शेअर दर हा 85 रुपयांवर होता. आज हा प्रीमियम दर 36 रुपयांवर आला आहे. रविवारी हा दर 60 रुपयांवर होता. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीसाठी 92 रुपयांपर्यंत प्रीमियम दर देण्यात आला होता. त्यात आता घसरण होऊन हा हा दर 36 रुपयांवर आला आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम एलआयसीच्या ग्रे मार्केट दरावर होत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले.
शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
गुंतवणूकदारांना आयीपीओसाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बोली लावता येणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस कंपनी आयपीओसाठी आलेल्या बोलींची पडताळणी करतील. त्यानंतर शुक्रवारी 13 मे रोजी एलआयसी शेअर अलॉटमेंट करणार आहे. शनिवारी आणि रविवारी शेअर अलॉटमेंट होणार नाही. एलआयसी शेअर बाजारात 17 मे रोजी लिस्ट होणार आहे.